अभ्यास करण्यास सांगितले म्हणून चौदा वर्षांच्या मुलाची आत्महत्या

भांडुपच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये शोककळा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – अभ्यास करण्यास सांगितले म्हणून नववीत शिकणार्‍या एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी एडीआरची नोंदवून आत्महत्या केलेल्या मुलाच्या पालकांची जबानी नोंदवून घेतली आहे. या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलाच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

ही घटना शनिवारी रात्री सव्वादहा वाजता भांडुपच्या रुणवाल ग्रीन इमारतीमध्ये घडली. याच अपार्टमेंटमध्ये चौदा वर्षांचा मुलगा त्याच्या पालकांसोबत राहत होता. त्याचे वडिल व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. सध्या तो याच परिसरातील एका नामांकित शाळेत नववीत शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यास करत नव्हता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. शनिवारी सायंकाळी याच कारणावरुन त्याची आई त्याला ओरडली होती. त्याचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो त्याच्या बेडरुमममध्ये गेला आणि त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रात्री उशिरापर्यंत तो रुमबाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने त्याला आवाज दिला होता, मात्र त्याने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. बर्‍याच वेळ रुमचा दरवाजा ठोठावून तो दरवाजा उघडत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता.

यावेळी तिला त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्याच्या आईसह वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले म्हणून या मुलाने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page