मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ डिसेंबर २०२४
ठाणे – घातक शस्त्रांचा धाक दाखवून एका महिलेकडील सुमारे बारा लाखांचे भारतीय आणि विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या एका टोळीचा ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सातजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मोहित हेमंत हिंदुजा, वरुण नरेश होटवानी, रोहन सतीश रेडकर ऊर्फ बाबू, स्वप्नील दिलीप ससाणे ऊर्फ बाबूराव, अन्वर सुबानी शेख, निता विष्णू मनुजा ऊर्फ भक्ती अशी या सहाजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील कारसह सुमारे २२ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सुनिता सिल्वराज पिल्ले ही ४५ वर्षांची महिला उल्हासनगर येथे राहते. ५ डिसेंबरला ती तिच्या कारमधून नाशिक-मुंबई हायवेवरुन जात होती. यावेळी ठाण्यातील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रिजवर अन्य एका कारने ओव्हरटेक करुन तिच्या कारला थांबविले. तिच्या मागे पोलीस आणि कस्टम अधिकारी आहेत असे सांगून या टोळीने घातक शस्त्रांचा धाक दाखवून तिच्याकडील सुमारे बारा लाखांची कॅश पळवून नेली होती. त्यात ११ लाख २९ हजार रुपयांचे ५० हजार सौदी रियाल आणि एक लाखांचे भारतीय चलन असा १२ लाख २९ हजार रुपये होते. या घटनेनंतर तिने राबोडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह खंडणीविरोधी पथकाने संमातर तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी मोहित हिंदुजा, वरुन होटवानी, रोहन रेडकर, स्वप्नील ससाणे, अन्वर शेख, निता मजुजा व एका अल्वयीन मुलाला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर महिलेसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविले होते. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेली एक मारुती कंपनीची इर्टिगा कार, होंडा शाईन, सुझुकी कंपनीची एक्सेस बाईक, गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, मोबाईलसह चोरी केलेली कॅश असा सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवार १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, संदीप भोसले, पोलीस हवालदार दिपक गडगे, आशिष ठाकूर, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, रविंद्र हासे, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, संतोष वायकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस नाईक चालक भगवान हिवरे यांनी केली.