मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ डिसेंबर २०२४
मुंबई, – गर्दीसह उघड्या घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सईद सिराज शेख आणि इम्तियाज उस्मान शेख अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे २३ हून अधिक मोबाईल जप्त केले आहेत. यातील मोहम्मद सईद हा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो चोरीचे मोबाईल इम्तियाज शेख याच्या मदतीने विकत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस कोठडीनंतर या दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रादार मालाडच्या खांडेकर दारुवाला कंपाऊंडमध्ये त्यांच्या मित्रांसोबत राहतात. १३ नोव्हेंबरला ते त्यांच्या घरी झोपले होते. त्यांचा मित्र कामावरुन उशिराने येत असल्याने त्यांनी रुमचा दरवाजा उघडा ठेवला होता. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या रुममध्ये प्रवेश त्यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांचे तीन मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर तक्रारदाराच्या निदर्शनास येताच त्यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मोबाईल चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
गेल्या काही महिन्यांत उत्तर मुंबईत अशाच प्रकारच्या मोबाईल चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे, पोलीस हवालदार जॉन फर्नाडिस, पोलीस शिपाई मंदार गोंजारी, राम महाडिक, सचिन गायकवाड, समाधान वाघ, दलीत पाईकराव, आदित्य राणे (तांत्रिक मदत) यांनी तपास सुरु केला होता.
हा तपास सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मालाड परिसरातून मोहम्मद सईदला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याने तक्रारदारासह त्यांच्या मित्रांचे तीन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. मोहम्मद सईद हा कांदिवलीतील चारकोप, साईकृपा सोसायटीमध्ये राहतो. परिसराची रेकी करुन तो गर्दीच्या ठिकाणासह रात्रीच्या वेळेस उघड्या रुममध्ये प्रवेश करुन मोबाईल चोरी करत होता. त्याच्याविरुद्ध मालाड, कांदिवली, मालवणीसह इतर पोलीस ठाण्यात अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
चोरीचे मोबाईल विक्रीसाठी तो मालाडच्या मालवणीतील एनसीसी कंपाऊंडचा रहिवाशी असलेला इम्तियाजला देत होता. या दोघांनी आतापर्यंत २३ मोबाईलची चोरी करुन त्याची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मालवणी परिसरातून इम्तियाजला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे विक्री केलेले वीसहून अधिक मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. अशा प्रकारे या तिघांकडून पोलिसांनी चोरीचे २३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.