मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – अनधिकृत दोन मजल्यावर कारवाई न करण्यासाठी दोन कोटीच्या लाचेची मागणी करुन ७५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अंधेरीतील के-पूर्व वॉर्डचे महानगरपालिकेचे अधिकारी मंदार अशोक तारी यांना गुरुवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र विशेष सेशन कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता, त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यांत त्यांना शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.
यातील तक्रारदार रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्यांनी त्यांच्या चार मजली इमारतीमध्ये दोन बेकायदेशीर मजले बांधले होते. या इमारतीची के-पूर्व महानगरपालिकेच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. त्यात दोन मजले बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही मजल्यावर कारवाईची नोटीस तक्रारदारांना पाठविण्यात आली होती. त्यामुळे ते स्वतला मनपा कार्यालयात गेले होते. त्यांनी वरिष्ठ अधिकारी मंदार तारी यांची भेट घेतली होती. या दोन्ही मजल्यावर कारवाई न करण्याची विनंती केली होती. ही कारवाई न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटीच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई थांबवून त्यांच्या शेजारच्या प्लॉटमध्ये सुरु असलेल्या इतर बांधकामात त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. लाचेची ही रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंदार तारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चर्चेअंती त्यांनी लाचेचा पहिला हप्ता ७५ लाख रुपयांचा देण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे मंदार तारी यांच्या सांगण्यावरुन मोहम्मद शाह आणि प्रतिक पिसे यांनी ७५ लाखांची लाच घेतली होती. ही लाच घेताना या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या कारवाईदरम्यान मंदार तारी पळून गेेले होते. या गुन्ह्यांत अटक टाळण्यासाठी त्याने विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला होता.
हा अर्ज फेटाळल्यानंतर गुरुवारी मंदार तारी याला या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यात त्यांना शुक्रवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर, राजेंद्र सांगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.