मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – हरविलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. पोलीस उपायुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी ३६ मालकांना त्यांचे मोबाईल परत केले. यावेळी या मालकांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले होते.
गेल्या काही महिन्यांत बोरिवली परिसरात रिक्षांमध्ये विसलेे तसेच अन्य प्रकरणात काही लोकांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांना गहाळ तसेच हरविलेले मोबाईल शोधून काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीतसिंह ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक धिरज वायकोस, पोलीस हवालदार मनोज परिट, राजेश पेडणेकर, पोलीस शिपाई गणेश पाटील, राहुल सांगळे, विकेश शिंगटे, महेंद्र महाले, अमोल फोपसे, संजय भोये, अनिकेत सकपाळ यांनी तपास सुरु केला होता.
सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून पोलिसांनी कौशल्यपूर्वक वापर करुन हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले. गेल्या काही दिवसांत ३६ हून अधिक मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्यांच्या मूळ मालकांना संपर्क साधण्यात आला होता. दहिसर येथील पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या कार्यालयात ३६ मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल परत केले होते. यावेळी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी अन्य मोबाईलचा शोध सुरु असून ते मोबाईल त्यांच्या मालकांना देण्यात येतील असे सांगून गहाळ आणि चोरी झालेल्या मोबाईलची पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमांत तिथे आलेल्या मोबाईलधारकांना सायबर अरेस्ट तसेच इतर ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत माहिती देताना असे गुन्हे रोखण्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे याबाबत मागदर्शन करण्यात आले होते.
दुसरीकडे हरविलेले परत मिळतील अशी कुठलीही शाश्वती नसताना कस्तुबा मार्ग पोलिसांनी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते परत मिळवून दिल्याप्रकरणी या सर्वांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे व त्यांच्या पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले होते.