मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – ड्रग्जच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी ताब्यात घेऊन एका ३१ वर्षांच्या तरुणाला खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याचा प्रयत्न करणे खार पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन अंमलदारांना चांगलेच महागात पडले आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित चारही पोलिसांना पोलीस सेवेतून निलंबित केल्यानंतर आता ११० दिवसांनी या चौघांविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ आंबोळे, पोलीस हवालदार इम्रान शेख, सागर कांबळे आणि दबंग शिंदे यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे या चौघांची लवकरच चौकशी होऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
डायलन ऍन्थोनी एस्टिबेरो हा तरुण सांताक्रुज येथील कालिना चर्च रोड, होली विव्ह अपार्टमेटचा रहिवाशी आहे. शाहबाज खान हा त्याचा मित्र असून ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. बालपणीचा मित्र असल्याने तो शाहबाजच्या शेळी पालन व्यवसायात त्याला मदत करत होता. ३० ऑगस्टला सायंकाळी साडेपाच वाजता तो शाहबाजच्या घरी होता. यावेळी त्याला चार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या खिशात वीस ग्रॅम एमडी ड्रग्ज ठेवून त्याला एमडी ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे असलेल्या एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
डायलनला ड्रग्जच्या गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये एका पोलीस त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या बेकायदेशीर कृत्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून गंभीर दखल घेत घेण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यात एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस अंमलदाराचा समावेश होता. ते चौघेही खार पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते. डायलनला खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ आंबोळे, पोलीस हवालदार इम्रान शेख, सागर कांबळे आणि दबंग शिंदे या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या चौकशीत ते चौघेही दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाईचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. या आदेशानंतर डायलन एस्टिबेरो याची वाकोला पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर संबंधित चारही पोलिसांविरुद्ध पोलिसांनी ११५ (२), ११८ (१), १२७ (१), १३७ (२), १९८, १९९, ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.