मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – पार्टटाईम जॉबची ऑफर देताना विविध टास्कद्वारे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणुक करणार्या दोन बंधूंना सुरत येथून कांदिवली पोलिसांनी अटक केली. मोमीन राजेशभाई टाडा आणि निमेश राजेशभाई टाडा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी या कटातील मुख्य सायबर ठगाला फसवणुकीसाठी आतापर्यंत वीसहून अधिक बँक खाते उघडून दिले असून या बँक खात्यात सुमारे २२ लाख रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्येक खात्यामागे त्यांना दहा हजार रुपयांचे कमिशन मिळत होते. याच पैशांतून या दोन्ही बंधूंनी डॉलर खरेदी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचा संगणक रिपेरिंगचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्यांना एका मॅसेजद्वारे पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती. कमिशनच्या मोहापायी त्यांनी ही ऑफरला होकार दिला होता. त्यानंतर त्यांना टेलिग्रामची एक लिंग पाठविण्यात आली होती. व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क देऊन त्यांना विविध टास्कसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या गुंतवणुकीवर त्यांना जास्त कमिशन मिळेल असे सांगून त्यांना त्याने जास्तीत जास्त रक्कम गुंतवणुक करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी विविध टास्कसाठी तीन लाख तेरा हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना कुठलीही कमिशनची रक्कम मिळाली नाही.
फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो पाटील, शामकुमार कापसे, मच्छिंद्र सोनावणे यांनी तपासाला सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पकिज्ञाने सुरत येथून मोमीन टाडा आणि निमेश टाडा या दोन बंधूंना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.
तपासात ते दोघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना विविध बँकेत खाते उघडून देत होते. प्रत्येक बँक खात्यासाठी त्यांना दहा हजार रुपयांचे कमिशन मिळत होते. त्यांनी आतापर्यंत विविध बँकेत वीसहून अधिक बँक खाते उघडून दिले होते. त्या पैशांतून ते दोघेही डॉलर खरेदी करत होते. त्यानंतर ते डॉलर निमेश हा मुख्य सूत्रधाराला टेलिग्रामच्या माध्यमातून पाठवत होता. मोमीनचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून त्याची टेलिग्रामच्या माध्यमातून या कटातील मुख्य सायबर ठगाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही त्याच्यासाठी काम करत होते. गेल्या पाच महिन्यांपासून ते पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन अनेकांना विविध टास्कच्या माध्यमातून गंडा घालत होते. ही रक्कत त्यांनी उघडून दिलेल्या बँक खात्यात जमा होत होते. या बँक खात्यात आतापर्यंत सुमारे २२ लाख रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. यातील बहुतांश बँक खाते पोलिसांनी फ्रिज केले आहेत.