गाडी पार्क करण्यावरुन ४१ वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येच्या गुन्ह्यांतील तिन्ही आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – गाडी पार्क करण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून किताबउल्ला शेख या ४१ वर्षांच्या व्यक्तीची तिघांनी मारहाण करुन हत्या केली. या हल्ल्यात त्यांचा मुलगा मोहम्मद जुनेद किताबउल्ला शेख (१९) हा जखमी झाला होता. त्याला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी हत्येसह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करुन विक्रोळी पोलिसांनी पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना काही तासांत अटक केली. मोहम्मद तारीक जैनुर आब्दीन, जिशान अहमद इश्तियाक खान आणि फुरकान अहमद इश्तियाक अहमद खान अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही विक्रोळीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता विक्रोळीतील सूर्यनगर, इस्लामपुरा, नूराणी जामा मशिदीजवळ घडली. याच परिसरात मोहम्मद जुनेद हा राहत असून तो सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. किताबउल्लाह शेख हे त्याचे वडिल आहेत. तिन्ही आरोपी याच परिसरातील रहिवाशी असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी सायंकाळी गाडी पार्क करण्यावरुन या तिघांचे किताबउल्लाह आणि मोहम्मद तारीक यांच्याशी वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि त्यांनी या दोन्ही पिता-पूत्रांवर लोखंडी स्कूल, हातातील कडे आणि लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात किताबउल्ला आणि मोहममद जुनेद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. किताबउल्ला यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मोहम्मद जुनेदवर विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले.
ही माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद जुनेद याच्या जबानीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना विक्रोळी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही शनिवारी दुपारी विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आल होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. गाडी पार्क करण्यावरुन झालेल्या वादातून किताबउल्ला शेख यांच्या हत्येने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.