बोगस स्वाक्षरी करुन सोसायटीच्या २७ लाखांचा अपहार
आर्थिक व्यवहार पाहणार्या कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – सोसायटीच्या धनादेशावर पदाधिकार्यांची बोगस स्वाक्षरी करुन सुमारे २७ लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीचा आर्थिक व्यवहार पाहणार्या मयुर कमलाकर कदम या कर्मार्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी मयुर हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
६९ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार खतलप्पा बालाजी फिरकी हे माटुंगा येथील लेबर कॅम्प, धारावी-माटुंगा सहकारी सोसायटीमध्ये राहतात. मुंबई महानगरपालिकेतून ते निवृत्त झाले आहे. पूर्वी तिथे नित्यानंद नावाची एक चाळ होती. या चाळीचे १९९५ साली रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. नंतर ही चाळ पुर्नविकासामध्ये गेली आणि तिथे एसआरएची एक इमारत बांधण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीला धारावी-माटुंगा सहकारी सोसायटी असे नाव देण्यात आले होते. वांद्रे येथील निबंधक कार्यालयाच्या आदेशावरुन तिथे एक कमिटी स्थापन करण्यात आली. २०१६-२०२१ साली सोसायटीची निवडणुक झाली होती. त्यात त्यांच्यासह इतर पदाधिकारी निवडून आले होते. २०२१ साली सोसायटीच्या कार्यकारिणीची मुदत संपली असून नवीन कार्यकारणीसाठी लवकरच निवडणुक जाहीर होणार आहेत.
यादरम्यान सोसायटीने मयुर कदम याला सोसायटीच्या कामासाठी नियुक्त केले होते. ही नियुक्ती करताना सचिवाने कुठल्याही पदाधिकार्याला विश्वासात घेतले नव्हते. त्याच्यावर सर्व सोसायटी सभासदाकडून मेंटेनन्स गोळा करणे, मेटेंनन्स बिलाचे वाटप करणे, लाईट, पाणीबिल भरणे, सोसायटीच्या बँक खात्यात आलेले धनादेश किंवा कॅश जमा करणे, सोसायटीच्या सर्व कामगारांचे पेमेंट करणे, जमा-खर्चाचा संपूर्ण तपशील पदाधिकार्यांना सादर करणे आदी कामाची जबाबदारी होती. त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांनी स्वाक्षरी केलेले धनादेश त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. २०२१ पासून त्यांनी सोसायटीच्या चेकवर कधीच स्वाक्षरी केली नव्हती.
९ ऑक्टोंबर २०२४ रोजी त्यांना त्यांच्या बँकेतून कॉल आला होता. या कर्मचार्याने बँकेत ५० हजाराचा एक धनादेश आला आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी आहे. मात्र त्यांची स्वाक्षरी जुळत नसल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांना कॉल केल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी ५० हजाराच्या धनादेशावर आपण स्वाक्षरी केली नसल्याचे सांगून ते पेमेंट थांबविण्याची विनंती केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बँकेच्या मॅनेजर स्नेहा सूर्यकांत भोईटे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी ५० हजाराच्या धनादेशची पाहणी केली असता त्यात त्यांची स्वाक्षरी अन्य कोणीतरी केल्याचे दिसून आले. त्यानंतर इतर धनादेशाची पाहणी केली असता त्यात त्यांच्यासह इतर पदाधिकार्यांची बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून पैसे काढल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर त्यांनी त्यांच्या इतर पदाधिकार्यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मयुर कदमला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. या घटनेनंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत मयुर कदम यांनीच सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांची बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून पैसे काढले होते. १ जानेवारी २०२२ ते २४ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत मयुरने विविध धनादेश बँकेत जमा करुन २७ लाख ४९ हजार ५०० रुपये काढून या पैशांचा परस्पर अपहार करुन सोसायटीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच खतलप्पा फिरकी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मयुर कदम याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मयुर हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.