फ्लॅटसाठी पैशांचा अपहार केल्याप्रकरणी आरोपीस अटक
स्वस्तात म्हाडा फ्लॅट देण्याचे आमिषाने गंडा घातला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी पैशांचा अपहार केल्याप्रकरणी रियाज अन्सार अहमद अन्सारी या मुख्य आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत मुद्दस्सर नदर सिराजुद्दीन अन्सारी हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणुकीचा याच गुन्ह्यांत रियाज हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
संदीपकुमार रामप्रसाद सिंग हे गोरेगाव येथे राहत असून त्यांचा बालाजी स्प्रे वर्क नावाची एक कंपनी आहे. त्यांचा स्प्रे आणि पेटींगचा व्यवसाय असून गोरेगाव परिसरात त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय आहे. ऑगस्ट २०२३ रोजी त्यांची रियाजसोबत ओळख झाली होती. त्याने त्याचा मुद्दस्सर नावाचा मित्र असून तो म्हाडा एजंट म्हणून काम करतो. दहिसर येथील डेल्टा टॉवरजवळ न्यू म्हाडा इमारतीमध्ये म्हाडाचे १६० चौ. फुटाचे दोन फ्लॅट आहेत. ते दोन्ही फ्लॅट त्यांना स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले होते. स्वस्तात म्हाडाचे फ्लॅट मिळत असल्याने त्यांनी मुद्दस्सरला भेटण्याची तयारी दर्शविली होती.
ठरल्याप्रमाणे त्यांच्या फ्लॅटविषयी चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान त्याने त्यांना दोन्ही फ्लॅटचे कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास ंसंपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांना सतराव्या मजल्यावरील १७०३ आणि १७०४ क्रमांकाचे फ्लॅट दाखविले होते. ते दोन्ही फ्लॅट त्यांना आवडले. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी रियाज आणि मुद्दस्सर यांना टप्याटप्याने १२ लाख ३१ हजार रुपये दिले होते. पेमेंट दिल्यांनतर त्यांनी आठ दिवसांत दोन्ही फ्लॅट रजिस्ट्रेशन करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र एक महिना उलटूनही त्यांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. या घटनेनंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. अनेकदा भेटण्याचा प्रयत्न करुनही त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्याकडून टोलवाटोलवी सुरु असल्याचे लक्षात येताच त्यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्यांनी पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रियाजसह मुद्दस्सर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी पळून गेले होते. या दोघांचा शोध सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या रियाजला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुद्दस्सरच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.