मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच तीन नातेवाईकांनी विनयभंग केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेसह तिन्ही नातेवाईकाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.
१५ वर्षांची बळीत मुलगी ही विक्रोळी परिसरात राहत असून तिन्ही आरोपी तिचे नातेवाईक आहे. महिला तिची आत्या तर इतर दोनजण तिचे काका आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजता ती त्यांच्या घरी होती. घरात कपडे बदलत असताना तिच्या काकांनी तिच्या छातीसह गळ्यावर अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दुसर्याने तिचे दोन्ही हात पकडले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने तिच्या आत्याला हाक मारली होती. यावेळी तिच्या आत्याने तिला जे होत आहे ते होऊ दे, नंतर काय होईल हे तुला सांगता येणार नाही असे सांगून या दोघांच्या अश्लील कृत्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला होता.
काही वेळानंतर ती तिच्या घरी गेली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने तिला विक्रोळी पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी बळीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही नातेवाईक आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. पंधरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच नातेवाईकाकडून झालेल्या विनयभंगाच्या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.