मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांसह जिवे मारण्याची धमकी देऊन एका फ्लॅटमध्ये घुसून दोन अज्ञात व्यक्तींनी सुमारे दहा लाख रुपयांची कॅश पळवून नेल्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.
ही घटना शुक्रवारी २० डिसेंबरला सायंकाळी सात वाजता गिरगाव येथील दुसरा पांजरापोळ, गुलालवाडी सर्कलमधील श्रीनाथ सहकारी सोसायटीमध्ये घडली. इंदरकुमार मोतीलाल प्रजापती हा भुलेश्वर परिसरात राहत असून एका खाजगी कुरिअर कंपनीत कामाला आहे. हरिश प्रजापती हे त्याचे मालक असून त्यांनी शुक्रवारी त्याला दहा लाख रुपये दिले होते. ही कॅश घेऊन तो गिरगाव येथील श्रीनाथ सोसायटीमध्ये आला होता. यावेळी त्याच्या मागून दोन तरुण एका फ्लॅटमध्ये घुसले. या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्यासह त्याचा सहकारी अनुरागसिंग उमेशसिंग राजपूत यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन त्यांनी त्यांच्याकडील दहा लाखांची कॅश घेऊन पलायन केले होते. पळून जाताना या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली होती.
या प्रकारामुळे ते दोघेही प्रचंड घाबरले होते. त्यांनी ही माहिती नंतर त्यांच्या मालकांना दिली. मालकाच्या सूचनेनंतर त्यांनी घडलेला प्रकार व्ही. पी रोड पोलिसांना सांगितला. याप्रकरणी इंदरकुमार प्रजापती याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.