मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – गाडीचा धक्का लागला म्हणून आदिल तालिब खान या ३४ वर्षांच्या व्यक्तीची दोघांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपी बंधूंना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद रफिक अब्बासअली शेख ऊर्फ पप्पू आणि अब्दुल करीम अब्बासअली शेख अशी या दोन बंधूंची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, बुद्ध विहारमागील गल्लीतील रमनमामा नगरात घडली. याच परिसरात शबीना आदिल खान ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. शनिवारी आरोपीच्या आईला कारचा धक्का लागला होता. याच कारणावरुन आदिलचे मोहम्मदरफिक आणि अब्दुल करीमशी वाद झाला होता. याच वादातून रात्री अकरा वाजता ते दोघेही आदिलच्या घरी आले होते. यावेळी या दोघांनी आदिलवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी झालेल्या आदिलला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी आदिलीची पत्नी शबीना हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडललेा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर शबीनाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपी बंधूंविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर पळून गेलेल्या या दोन्ही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. शेख बंधू हे गोवंडीतील बैंगनवाडीतील रहिवाशी असून ते दोघेही भंगार विक्रीचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.