मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
नवी मुंबई, – रॉबरीच्या उद्देशाने संगीता राजेंद्र आगवणे या ४९ वर्षांच्या महिलेची हत्या करुन पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस पनवेल गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मध्यप्रदेशातून अटक केली. शरद धनश्याम साहू असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येनंतर शरद हा नवी मुंबईतून पळून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मध्यप्रदेशात वास्तव्यास होता, अखेर त्याला अडीच महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संगीता ही पनवेल तालुक्यातील वळप गावातील रहिवाशी आहे. ७ ऑक्टोंबर २०२४ ती खाजगी शिकवणीचे क्लास संपवून गावाबाहेरील आपल्या घरी जात होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने रॉबरीच्या उद्देशाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तिची गळा आवळून हत्या करुन तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, झुमके, सोनसाखळ्या, पोको कंपनीचा मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आला होता. या रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी रॉबरीसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमीत काळे यांनी गंभीर दखल घेत पनवेल तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, अजीत कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, प्रताप देसाई, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, जगदीश तांडेल, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, रणजीत पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजीत कानू, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजीत पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे, पोलीस शिपाई अमोल मोहिते, महिला पोलीस शिपाई अदिती काकडे, मनिषा केदार यांनी तपासाला सुरुवात केली होती. घटनास्थळ निर्जनस्थळ असल्याने तसेच कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपीची माहिती मिळविण्यात पोलिसांना अनेक अडचणी आल्या होत्या. तरीही पोलिसांनी तपास सुरु करुन संशयितांची चौकशी सुरु केली होती.
या चौकशीदरम्यान एका संशयित व्यक्तीची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले. या व्यक्तीकडेच चोरीचा मुद्देमाल असून तो गुन्हा घडल्यानंतर त्याच्या मध्यप्रदेशातील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मध्यप्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक माहितीवरुन शरद साहू या ४५ वर्षांच्या व्यक्तीला संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यानेच या महिलेची रॉबरीच्या उद्देशाने गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल घेऊन पलायन केले होते. या कबुलीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नवी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला गुरुवार २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शरद हा मूळचा आसामच्या पुरी, गोपच्य शिसव सामिली गोलसरचा रहिवाशी असून वेल्डिंगचे काम करत होता. मृत महिला त्याच्या परिचित असून ती त्याला आवडत होती. गुन्ह्यांची दिवशी त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या करुन तिच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केले होते. रॉबरीसह हत्येचा कुठलाही पुरावा नसताना केवळ तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अवघ्या दोन महिन्यांत मुख्य आरोपीस अटक करुन या हत्येच्या गुन्ह्यांची उकल केली. या कामगिरीबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यासह पोलीस कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.