मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ मार्च २०२४
मुंबई, – परळ येथे राहणार्या एका ५० वर्षांच्या समाजसेविकेच्या घरी गुरुवारी दुपारी चार अज्ञात व्यक्तीने आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन घराची झडती घेतली, अर्ध्या तासाच्या झडतीनंतर चारही तोतया अधिकार्यांनी पलायन केले. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी पळून गेलेल्या तोतया अधिकार्याविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावना सुधीर चौरगे ही तक्रारदार महिला समाजसेविका असून ती तिच्या कुटुंबियांसोबत परळ येथील सेंट झेव्हीअर स्ट्रिट, खिमावत सदन इमारतीमध्ये राहते. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे कामासाठी तर तिचा भाचा कॉलेजला निघून गेला. यावेळी घरात तिची बहिण भारती ही एकटीच होती. दुपारी दोन वाजता तिच्या घरी चार व्यक्ती आले होते. आपण आयकर विभागाचे अधिकारी आहोत, घराची झडती घ्यायची आहे असे सांगून दोघांनी आत प्रवेश केला तर दोनजण दरवाज्याबाहेर उभे राहिले होते. जवळपास अर्धा तास झडती घेतल्यानंतर ते चौघेही तेथून काहीही न सांगता निघून गेले. जाताना घरातील कोणतीही वस्तू त्यांनी त्यांच्यासोबत नेली नव्हती.
ही माहिती नंतर भारतीने भावना चौरगे हिला दिली. घडलेला प्रकार संशयास्पद होता, घरात आलेले व्यक्ती नक्की आयकर विभागाचे अघिकारी होते का याबाबत शंका निर्माण झाल्याने तिने भोईवाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही तोतया आयकर विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध १७०, ४४८, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या तोतया अधिकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.