मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – आर्थिक वादातून एका बिल्डींग कॉन्ट्रक्टर व्यावसायिकाचे अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी २५ लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांना डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल अजीज जहरिशा सय्यद आणि हनीफ सैफुर रेहमान खान अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान खंडणीसाठी अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
४५ वर्षांचे जहुरुल्ला सलीम शेख हे व्यावसायिक असून ते बिल्डींग कॉन्ट्रक्टर म्हणून डोंगरी परिसरात परिचित आहेत. डोंगरीतील निशानपाडा क्रॉस लेन, मोहम्मद उमर कोकीळ मार्ग, निझामिया मंझिल इमातरीमध्ये ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. अजीज सय्यद हा याच व्यवसायाशी संबंधित असून काहीमहिन्यांपूर्वी त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते. त्याला जहुरुल्ला यांच्याकडून बांधकामाचे काही पेसे येणे बाकी होते. याच आर्थिक वादातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाद सुरु होता. हा वाद सध्या विकोपास गेला होता. जहुरुल्ला शेखकडून पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी इतर सहकार्यांच्या मदतीने त्यांच्या अपहरणाची योजना बनविली होती.
रविवारी रात्री उशिरा साजिद, वडाळा आणि मोहसीन या तिघांनी डोंगरीतील निशानपाडा क्रॉस रोड, काश्मिरी इमारतीजवळ जहुरुल्ला यांना आर्थिक वादातून शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. मारहाणीनंतर ते तिघेही त्यांना स्कूटरवरुन शिवडी येथे घेऊन आले होते. अपघातानंतर त्यांना दगडी मशिदीजवळील एका रुममध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. तिथेही त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडे २५ लाखांची मागणी करण्यात आली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकीच या तिघांनी दिली होती. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी जहुरुल्ला शेख यांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना डोंगरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिवडीतून त्यांची सुटका करुन अपहरण केलेल्या अब्दुल अजीज आणि हनीफ या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीतून आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.