वयोवृद्ध भावाची भावासह पुतण्याकडून साडेसात कोटीची फसवणुक
६६२८ ग्रॅम सोने, २.८७ कोटीच्या कॅशचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
मुंबई, गोरेगाव येथे राहणार्या एका ७० वर्षीय वयोवृद्ध व्यापार्याची त्यांच्याच भावासह पुतण्याने सुमारे साडेसात कोटीची फसवणुक केल्याची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामजीवनलाल कन्हैय्यालाल सोनी आणि मनिष रामजीवन सोनी या पिता-पूत्राविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोघांवर ६६२८ ग्रॅम सोन्यासह २ कोटी ८७ लाख रुपयांची कॅश असा ७ कोटी ५८ लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
७० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रामसजीवनलाल कन्हैय्यालाल सोनी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील यशोधाम, श्रीकृष्ण सुदामा बंगलोमध्ये राहतात. ते व्यवसायाने ज्वेलर्स व्यापारी असून काळबादेवी परिसरात त्यांच्या मालकीचे एम. एल कन्हैय्यालाल ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. या शॉपची जबाबदारी त्यांचा भाऊ रामजीवनलाल आणि त्याचा मुलगा मनिष यांच्यावर होती. याच व्यवसायासाठी त्यांनी त्यांच्याकडे पावणेपाच कोटीच्या ६६२८ ग्रॅम सोन्याची गुंतवणुक केली होती. मार्च २०१९ साली त्यांच्या भावाला काही सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यासाठी तयांनी त्याला १२ मार्च २०१९ रोजी १ कोटी ९७ लाख ६४ हजार ६७० रुपये तर २ एप्रिल २०१९ रोजी ९० हजार १० हजार ५०० रुपये असे २ कोटी ८७ लाख १७० रुपयांचे पेमेंट केले होते.
हा संपूर्ण व्यवहार जानेवारी २०१५ ते २ डिसेंबर २०१९ या कालावधीत झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत सोनी पिता-पूत्रांनी त्यांना सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. वारंवार विचारणा करुनही ते विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. रामजीवन आणि मनिष सोनी यांच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडे त्यांनी गुंतवणुक केलेल्या ७ कोटी ५८ लाख रुपयांच्या कॅशसहीत सोन्याची मागणी सुरु केली होती. मात्र सतत मागणी करुनही त्यांनी त्यांना कॅशसहीत दागिने परत केले नाही. या पिता-पूत्रांनी कॅशसहीत सोन्याचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रामजीवन सोनी आणि मनिष सोनी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित दोन्ही पिता-पूत्रांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून पोलिसांना देण्यात आले आहे.