मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
मुंबई, – साकिनाका आणि चेंबूर येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. लक्ष्मीकांत लालबिहारी दुबे (४२) आणि दानमल जैन (५९) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी साकिनाक आणि टिळकनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघताची नोंद केली असून पळून गेलेल्या चालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिला अपघात रविवारी सकाळी आठ वाजता चेंबूर येथील छेडानगर, एससीएलआर ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर झाला. लक्ष्मीकांत दुबे हा मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी आकृतीच्या शिवसृष्टी अपार्टमेंटमध्ये राहत असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. रविवारी सकाळी सात वाजता तो नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाला होता. त्याच्या पल्सर बाईकवरुन चेंबूरच्या दिशेने जात असताना छेडानगर, एससीएलआर ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर एका अज्ञात वाहनाने त्याच्या कारला धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
दुसरा अपघात शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता साकिनाका येथील खैरानी रोड, कॅफे नाझ हॉटेलसमोर झाला. दानमल जैन हे गिरगाव येथे राहत असून त्यांचा स्टेनलेस स्टिलचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी ते साकिनाका येथे कामासाठी आले होते. यावेळी एका भरवेगात जाणार्या डंपरने त्यांना धडक दिली होती. अपघातात जखमी झालेल्या दानमल यांचा सायंकाळी पॅरामाऊंट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या दोन्ही अपघातानंतर दोन्ही आरोपी चालकांनी घटनास्थळाहून पलायन केले होते. त्यांच्यामुळे त्यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून दोन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साकिनाका आणि टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या चालकांचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरु केला आहे.