मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
मुंबई, – खंडणीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. विजयानंद दिगंबर शिरोडकर असे या आरोपीचे नाव असून फेब्रुवारी महिन्यांत खंडणीचा गुन्हा दाखल होताच तो दहा महिन्यांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदाराचा कपडे विक्रीचा वयवसाय आहे. बोरिवलीतील जया सिनेमागृहासमोरील फुटपाथवर तो कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्याकडून विजयानंद हा दरमाह हप्ता घेत होता. आतापर्यंत त्यांनी त्याला ८५ हजाराचा हप्ता दिला आहे. फुटपाथवर धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल. ज्यांनी हप्ता दिला त्यांना तो तिथे व्यवसाय करु देत होता, मात्र ज्यांनी हप्ता देण्यास नकार दिला, त्यांना तो व त्याचे सहकारी धंदा करु देत नव्हते. त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्यामुळे भीतीपोटी त्याला अनेक फेरीवाले खंडणीची रक्कम देत होते. ऑक्टोंबर २०२३ पासून त्याने त्याला हप्ता देण्यास बंद केे होते. त्यामुळे त्याला इलियास, कैलास, रुपेसिंग व अन्य एकाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो विजयानंदला भेटायला गेला आणि त्याची आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याला दोन दिवसांत तुझा निर्णय घेतो अशी धमकी दिली होती. त्याच्याकडून जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत विजयानंद हा गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता. तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला तीन दिवसांपूर्वी बोरिवली येथून पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इलियास बेलीम, कैलास बाबर, रुपेसिंग व अन्य एकजण सहआरोपी आहे. ही टोळी फेरीवाल्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करत होते. विजयानंद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ३० हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते.