मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – अल्पावधीत चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका ७२ वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी हिरेनकुमार बारवालिया या आरोपीस गुजरातच्या सुरत शहरातून सायबर सेल पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिरेनकुमार हा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अकराहून अधिक फसवणुकीसह आयटीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वयोवृद्ध तक्रारदार अजीत माधव पाडगावकर हे अंधेरीतील जे. पी रोड, मधुवन सोसायटीमध्ये राहतात. ते एका शिपिंग कंपनीतून २०१६ साली निवृत्त झाले आहे. २२ एप्रिल २०२४ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असा मॅसेज पाठविला होता. त्यानंतर त्याने त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये शेअरमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास कसा फायदा होतो असे दाखविले जात होते. गु्रपमधील अनेकांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली होती, त्यात त्यांना चांगला परतावा मिळत होता. त्यामुळे ग्रुप ऍडमिनकडून त्यांनाही सतत विचारणा होत होती. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. २२ एप्रिल ते १८ जून २०२४ या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये एक कोटी एक लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ग्रुप ऍडमिनशी चर्चा केली असता त्याने त्यांना विविध टॅक्सच्या नावाने काही रक्कम भरण्यास सांगितले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्याशिवाय त्यांची गुंतवणुक आणि परताव्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांना ट्रान्स्फर केली होती. तरीही त्यांनी त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केले नाही. विविध कारण सांगून ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत हाते. त्यानंतर त्यांनी त्यांना ग्रुपमधून बाहेर काढून त्यांचे ऍप बंद करुन टाकले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा आरोपींचा शोध सुरु असताना या पथकाने सुरत शहरातून हिरेनकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत हिरेनकुमार हा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध मुंबईसह सुरत शहरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीचे अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने सायबर ठगांना काही बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीने आतापर्यंत शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. ऑनलाईन फसवणुक करणार्या ही सराईत टोळी आहे. या टोळीच्या इतर सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.