पोलीस अधिकार्‍याला लाकडी दांड्याने मारहाण

आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – वाहतुकीला अडथळा आणणार्‍या व्यक्तीला बाजूला केले म्हणून रागाच्या भरात त्याने एका पोलीस अधिकार्‍याच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अरुण हरिजन या आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या हल्ल्यात माणिक मारुती सावंत हे जखमी झाल्याने त्यांच्यावर तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मालाड येथील काचपाडा, साईप्रसाद बारजवळील ओल्ड सोनल इंडस्ट्रियलच्या गेटसमोर घडली. माणिक सावंत हे दहिसर येथील आनंदनगरचे रहिवाशी असून सध्या मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांची पोस्टिंग मालाड पोलीस ठाण्यात आहे. ख्रिसमसच्या सणानिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते मालाड परिसरात त्यांच्या सहकार्‍यासोबत गस्त घालत होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ते सर्वजण काचपाडा सिग्नल लिंक रोडकडून रामचंद्र स्टेशन लेनच्या दिशेने जात होते.

यावेळी साईप्रसाद बार, सोन इंडस्ट्रिजच्या गेटसमोर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्यांी तिथे जाऊन पाहणी केली असता एक तरुण रस्त्याच्या मध्येच उभा राहून हातवारे करुन येणार्‍या जाणार्‍या वाहनांना थांबवून तिथे अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे माणिक सावंतसह इतर पोलिसांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांनी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला बाजूला करुन पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.

याच दरम्यान तो तरुण तिथे पुन्हा आला आणि त्याने माणिक सावंतसह पोलीस हवालदार गायकवाड यांना तुम्हाला आता संपूवनच टाकतो अशी धमकी देऊन त्याच्याकडील लाकडी दांड्याने फटका मारला. डोक्याला दुखापत झाल्याने माणिक सावंत हे जखमी झाले. याच दरम्यान गायकवाड यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. यावेळी जखमी झालेल्या माणिक यांना जवळच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

चौकशीदरम्यान मारहाण करणार्‍या तरुणाचे नाव अरुण हरिजन असल्याचे उघडकीस आले. तो मालाडच्या काचपाडा परिसरात राहत होता. या घटनेनंतर माणिक सावंत यांच्या जबानीवरुन मालाड पोलिसांनी अरुण हरिजनविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page