मनपामध्ये सतत तक्रारी करतो म्हणून दाम्त्यावर प्राणघातक हल्ला
एकाच कुटुंबातील अकराजणांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – महानगरपालिकेत सतत तक्रारी करतो म्हणून एका दाम्त्यावर त्यांच्याच शेजारी राहणार्यांनी प्राणघातक हल्ल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील अकराजणांविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. झाहिद बलोच, झिशान बलोच, सोहेल बलोच, नासीर बलोच, सैफु बलोच, अंजुम बलोच, झैनब बलोच, झरीन बलोच, झरीना इस्माईल बलोच, अब्दुल जब्बार सत्तार शेख ऊर्फ हुसैन अशी या अकराजणांची नावे आहेत. या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर सात ते आठजणांना नंतर पोलिसांनी अटक केली होती. इम्तियाज हुसैन अल्लारखॉं धोनिया आणि शेरबानी इम्तियाज हुसैन धोनिया अशी हल्ल्यात जखमी झालेल्या पती-पत्नीचे नाव असून या दोघांवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता अंधेरीतील कामा रोड, गावदेवी डोंगरी, वाहिद लाला की चाळीत घडली. या चाळीत इम्तियाज हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्याच्याच शेजारी बलोच कुटुंबिय राहतात. इम्तियाज हा त्यांच्याविरुद्ध सतत महानगरपालिकेत तक्रार करत होता. त्यामुळे मनपा अधिकारी तिथे येऊन बलोच कुटुंबियांवर कारवाई करत होते. काही दिवसांपूर्वी बलोच कुटुंबियांनी त्यांच्या घरासमोर एक पाण्याचा ड्रम ठेवला होता. याबाबत इम्तियाजने पुन्हा महानगरपालिकेत तक्रार केली होती. ही माहिती समजताच बलोच कुटुंबियांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात बलोच कुटुंबियांनी इम्तियाज आणि त्यांची पत्नी शेरबानी हिच्यावर बांबू, दगड आणि विटांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात इम्तियाजच्या कपाळावर, उजव्या बरगडीवर आणि उजव्या हाताला आणि शेरबानी हिच पाठीवर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांनाही तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी इम्तियाजच्या जबानीवरुन पोलिसांनी बलोच कुटुंबातील अकराजणांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच झाहिदसह इतर सर्व आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या सर्वांची चौकशी सुरु असून चौकशीनंतर सात ते आठजणांना नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकलक कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.