इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या नावाने गंडा घालणार्‍या ठगाला अटक

१ कोटी १२ लाखांचा अपहार; ८२ लाखांची कॅश परत मिळविली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या नावाने गंडा घालणार्‍या भरत दिपक चव्हाण नावाच्या एका मुख्य सायबर ठगाला अटक करण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. या टोळीने अलीकडेच एका वयोवृद्धाला शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यात चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून त्यांची १ कोटी १२ लाखांची फसवणुक केली होती. मात्र तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करुन सुमारे ८२ लाख रुपयांची कॅश हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. ही रक्कम विविध ३३ बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती, या सर्व बँक खाती फ्रिज करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांनी सांगितले.

संदीप चंद्रकांत देशपांडे हे ६८ वर्षांचे वयोवृद्ध अंधेरीतील शेरे-ए-पंजाब कॉलनीत राहत असून ते एका खाजगी बँकेतून निवृत्त झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्यांना एक मॅसेज आला होता. त्यात त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती देताना त्यात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ऑनलाईन शेअर मार्केटसंबंधित नोटिफिकेशन पाठवून एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांना शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून संदीप देशपांडे यांनी १४ डिसेंबर २०२३ ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अज्ञात सायबर ठगांनी बनविलेल्या अकाऊंटवर १ कोटी १२ लाख २६ हजार रुपयांची शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केली होती. यावेळी खरेदी केलेल्या शेअरवर त्यांना चांगला नफा मिळत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी मुद्दल रक्कमेसह नफ्याची रक्कम मिळण्यासाठी त्यांच्याकडे विनंती केली होती. यावेळी त्यांना विविध टॅक्ससाठी काही रक्कम जमा करावी लागेल. ही रक्कम जमा केली नाहीतर त्यांना त्यांची रक्कम मिळणार नाही असे सांगण्यात आले होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घडलेला प्रकार सायबर सेल पोलिसांना सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर संदीप देशपांडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध १२० बी, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८ भादवी सहकलम ६६ क, ६६ ड आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक होळकर, पोलीस हवालदार सुनिल दळवी, पोलीस शिपाई केशव तकीक यांनी तपासाला सुरुवात केला होता.

तपासात फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या बँक खात्याची माहिती काढून या खात्यातील रक्कम गोठविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी ३३ बँक खात्यात ट्रान्स्फर झालेली सुमारे ८२ लाख रुपयांची कॅश फ्रिज करण्यात पोलिसांना यश आले होते. याच दरम्यान तांत्रिक माहितीवरुन या पथकाने भरत चव्हाण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भरत हा वांद्रे येथील खेरवाडी, टिचर्स कॉलनीजवळील अली यावर जंग मार्गावरील कमला गोस्वामी चाळीत राहत होता. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शेअरमध्ये गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून फसवणुक करणारी एक टोळी असून या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे भरतच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page