आग्रीपाडा येथे रिषभ ज्वेलर्समध्ये रॉबरीने घटनेने खळबळ
घातक शस्त्रांच्या धाकावर १.९३ कोटीचे दागिने पळविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – आग्रीपाडा येथे रिषभ ज्वेलर्स दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन अज्ञात व्यक्तीनी घातक शस्त्राचंा धाक दाखवून रॉबरी केली. जिवे मारण्याची धमकीसह ज्वेलर्स व्यापार्यावर हल्ला करुन या व्यक्तीने दुकानातील विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश असा १ कोटी ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. दुपारी घडलेल्या या दरोड्याच्या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता भायखळा येथील सातरस्ता, साने गुरुजी मार्ग, लक्ष्मीदास वाडीतील शॉप क्रमांक चौदामध्ये घडली. भवरलाल धरमचंद जैन हे चिंचपोकळी बालमुकूंद मार्ग, चंद्रदर्शन हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे लक्ष्मीदास वाडीत रिषभ ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान आहे. रविवारी दुपारी ते त्यांच्या दुकानात बसले होते. यावेळी त्यांच्या दुकानात दोन तरुण आले. या दोघांनी सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहे असे सांगून त्यांना दागिने दाखविण्यास सांगितले. त्यामुळे ते दोघांनाही दागिने दाखवत होते. यावेळी काही कळण्यापूर्वीच या दोघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण करुन दोरीच्या सहाय्याने त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर या दोघांनीही दुकानातील विविध सोन्या-चांदीचे दागिने, कॅश आदी मुद्देमाल पळवून नेला. त्यात १ कोटी ९१ लाख ७० हजार रुपयांचे २४५८ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, १ लाख ७६ हजार रुपयांचे २२०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १५ हजार रुपयांची कॅश, एक वायफाय राऊटर असा १ कोटी ९३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता.
दोन्ही आरोपी पळून गेल्यानंतर काही वेळाने त्यांनी स्वतची सुटका केली आणि ही माहिती आग्रीपाडा पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी भवरलाल जैन यांची जबानी नोंदवून घेतल्यांनतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने परिसरातील व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहे. या दोन्ही आरोपींना लवकरच चोरीच्या मुद्देमालासह अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.