झोपेत दगडाने प्राणघातक हल्ला करणार्या वयोवृद्धाला अटक
खार पोलिसांची कामगिरी; हल्ल्यामागील कारण स्पष्ट नाही
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – फुटपाथवर झोपलेल्या अरुण भगवत पाटील या ३६ वर्षांच्या व्यक्तीवर दगडाने प्राणघातक हल्ला करुन पळून गेलेल्या एका ७४ वर्षांच्या वयोवृद्धाला कुठलाही पुरावा नसताना खार पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. धर्मा माया बसवंत असे या वयोवृद्धाचे नाव असून त्याच्याविरुद्ध गंभीर दुखापती केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले नाही, मात्र धर्मा बसवंत याने दारुच्या नशेत हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अरुण पाटील हा वांद्रे येथील लालमिठ्ठी ब्रिजवळील फुटपाथवर राहत असून भंगार गोळा करण्याचे काम करतो. ३१ डिसेंबरला दुपारी बारा वाजता तो खार येथील रोड क्रमांक तीन, मनिष सायकल दुकानासमोरील फुटपाथवर झोपला होता. दुपारी पाऊणच्या सुमारास झोपेत असताना त्याच्या डोक्यात एका अज्ञात व्यक्तीने दगडाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात नाकाला, डोक्याला, ओठाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या नाकाला फॅ्रक्चर झाले होते. ही माहिती प्राप्त होताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अरुण पाटील याच्या जबानीनंतर खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दतता कोंकणे, तुषार काळे, सहाय्यक पोलीस फौजदार मनोज वैद्य, पोलीस हवालदार आनंद निकम, पोलीस शिपाई संजय सानप, अजीत अजित जाधव, मारुती गळवे, अभिजीत कदम यांनी धर्मा बसवंत याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच अरुण पाटील याच्यावर दगडाने झोपेत असताना प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली.
धर्मा हा मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, शांतीनगर झोपडपट्टीत राहतो. तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. तो वांद्रे, खार आणि निर्मलनगर परिसरात नियमित भंगार गोळा करण्यासाठी येत होता. ३१ डिसेंबरला तो खार येथे आला होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत असताना काहीही कारण नसताना त्याने झोपेत असलेल्या अरुण पाटील याच्यावर दगडाने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये धर्मा हा पोलिसांना दिसून आला होता. त्याचा शोध घेत असताना त्याला निर्मलनगर येथील हनुमान मंदिर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.