मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एका ४५ वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. परवेझ आलम कासिम अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पावणेनऊ लाखांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
बोरिवली परिसरात काहीजण हेरॉईनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील, प्रमोद निंबाळकर, पोलीस शिपाई फर्डे, भोई यांनी बोरिवलीतील जयवंत सावंत मार्ग, सुधीर फडके ब्रिजजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. रविवारी रात्री उशिरा तिथे परवेज अन्सारी आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ८७ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत ८ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.
तपासात परवेज हा मूळचा उत्तराखंडच्या हरिद्वारच्या मंगलोरचा रहिवाशी आहे. सध्या तो नालासोपारा येथील ओसवाल नगरी ऐहम बार, जेसी शाळेजवळ राहतो. हेरॉईनची डिलीव्हरीसाठी तो बोरिवली परिसरात आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते हेरॉईन कोणी दिले, तो हेरॉईन कोणाला देण्यासाठी आला होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची डिलीव्हरी केली आहे का, त्याचे इतर कोण सहकारी आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.