मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – काळबादेवी येथील एका खाजगी कार्यालयात झालेल्या सुमारे ३० लाखांच्या घरफोडीचा एल. टी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पळून गेलेल्या फिरोज मोहम्मद गौसुद्दीन शेख याला हावडा रेल्वे स्थानकातून अवघ्या २४ तासांत अटक करुन त्याच्याकडून चोरीची सर्व कॅश हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. फिरोज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ऍक्झॉस फॅन काढून त्याने कार्यालयात प्रवेश करुन ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार रोहित अनंतराय व्यास हे व्यापारी असून त्यांचे काळबादेवी येथील डायमंड मेंशन इमारतीमध्ये एक खाजगी कार्यालय आहे. याच कार्यालयात पॅन्ट्री कम स्टोअर रुम आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांच्या स्टोअर रुमच्या ऍक्झॉस फॅन काढून अडगळीच्या जागेतून अज्ञात चोरट्याने कार्यालयात प्रवेश केला होता. त्यानंतर कार्यालयातील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून तिजोरीतील सुमारे तीस लाख रुपयांची कॅश घेऊन पलायन केले होते. सकाळी हा प्रकार रोहित व्यास यांच्या लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना ही माहिती सांगितली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहित व्यास यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घरफोडीची वरिष्ठ पोलिसांनी गंभीर दखल त्याच दिवशी पुन्हा चार्ज घेणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय डोळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, अमोल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, प्रशांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश पाटील, पोलीस अंमलदार सागर विचारे, समीर परुळेकर, प्रफुल्ल पाटील, राजकुमार कांबळे, ज्ञानेश्वर सानप, शरदचंद्र साटम, संदीप वाकचौरे, बाळू शेंडे, संदीप वाक्से, दत्तात्रय सातपुते, गजानन बगळे, अनिल साळुंके, अविनाश जोशी यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांत फिरोज मोहम्मद शेख याचा सहभाग असल्याचे समजले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी फिरोजचा शोध सुरु केला होता. यावेळी फिरोज हा त्याच्या झारखंड येथील उधवा गावी पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर एल. टी मार्ग पोलिसांची एक टिम कोलकाता येथे गेली होती. या पथकाने हावडा रेल्वे स्थानकातून फिरोजला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण कॅश हस्तगत केली.
अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. घरफोडीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत फिरोजला चोरीच्या तीस लाखांच्या मुद्देमालासह शिताफीने अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे व त्यांच्या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.