मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – गिरणी कामगारासाठी देण्यात आलेल्या म्हाडाचे फ्लॅटचे स्वस्तात देण्याची बतावणी करुन दोन बंधूंची एका मायलेकींनी फसवणुक केली आहे. सुमारे अठरा लाखांचा अपहार करुन फसवणुक करणार्या या मायलेकीविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा मोडक आणि रुणाली मोडक अशी या दोघींची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या दोघींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
अजीत रमेश निंबाळकर हे नवी मुंबईतील रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचा भाऊ गिरीश याला नवीन घर घ्यायचे होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या एका परिचित महिलेकडून त्यांची रुणाली मोडकशी ओळख झाली होती. रुणालीने तिची म्हाडामध्ये ऋतुजा मोडक नावाची एक मॅडम कामाला आहे. ती गिरणी कामगाराची घर स्वस्तात मिळवून देत असल्याचे सांगितले होते. त्यांना घराची गरज असल्याने त्यांनी तिची भेट घेतली होती. जुलै २०२२ रोजी त्यांची त्यांच्या मैत्रिणीच्या घरी झालेल्या भेटीत ऋतुजाने त्यांच्या भावाला म्हाडाचे घर स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते.
तिची म्हाडामध्ये चांगली ओळख असून तिने आतापर्यंत अनेकांना कमी किंमतीत घर दिले आहेत असे सांगितले. त्यानंतर तिने त्यांना लालबाग येथील वेस्टर्न हाईट्स इमारतीमधील एक घर दाखविले होते. हाच फ्लॅट त्यांच्या भावाला देण्याचे मान्य केले होते. याच फ्लॅटसह त्यांच्यासह त्यांच्या भावाने ऋतुजा आणि रुपालीने त्यांच्याकडून ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सुमारे अठरा लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही तसेच फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हते.
विचारणा केल्यानंतर त्या दोघीही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली. नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या दोघींनी त्यांना काही धनादेश दिले होते. मात्र ते सर्व धनादेश न वटता परत आले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दोन्ही मायलेकीविरुद्ध दादर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ऋतुजा मोडक आणि रुणाली मोडक यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.