मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – हरविलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. पार्क पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत सुमारे तेरा लाख साठ हजार रुपयांचे १०२ मोबाईल त्यांच्या मालकांना देण्यात आले. यावेळी या मालकांनी पार्क साईट पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले होते.
गेल्या काही महिन्यांत घाटकोपर व आसपासच्या परिसरात बसस्टॉप, बसमध्ये प्रवास करताना काही लोकांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत त्यांनी पार्क साईट पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची अतिकिर्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर,, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे यांनी गंभीर दखल घेत पार्कसाईट पोलिसांना गहाळ तसेच हरविलेले मोबाईल शोधून काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, साहय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज चव्हाण, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, अजीत पाटील व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.
सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून पोलिसांनी कौशल्यपूर्वक वापर करुन हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले. गेल्या काही दिवसांत १०२ हून अधिक मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. त्याची किंमत तेरा लाख साठ हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर त्यांच्या मूळ मालकांना संपर्क साधण्यात आला होता. बुधवारी पार्कसाईट पोलीस ठाण्यातील एका कार्यक्रमांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी मूळ मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल परत केले होते. दुसरीकडे हरविलेले परत मिळतील अशी कुठलीही शाश्वती नसताना कस्तुबा मार्ग पोलिसांनी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते परत मिळवून दिल्याप्रकरणी या सर्वांनी पार्क साईट पोलिसांचे आभार व्यक्त केले.
पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त हस्तगत मुद्देमालाचे वितरण
पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त परिमंडळ पाचच्या दादर, शिवाजी पार्क, माहीम, शाहूनगर, धारावी, कुर्ला आणि विनोबा भावे नगर पोलिसांनी विविध गंभीर गुन्ह्यांतील चोरीचे मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने, वाहनासह इतर मुद्देमालाचे वितरण केले. विविध गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यात १ कोटी ७१ लाख ७२ हजार ७७४ रुपयांच्या मुद्देमालाचा सामवेश आहे. या मुद्देमालापैकी ३९८ सोन्या-चांदीचे दागिने, १६७ मोबाईल, २२ वाहने आणि अन्य मुद्देमाल त्यांच्या मालकांना परत करण्यात आला. धारावी येथील संत रोहिदास मार्ग, मॉर्निंग स्टार स्कूल हॉलमध्ये एका कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला २५० ते ३०० नागरिक उपस्थित होते. यावेळी तक्रारदार निधी सिंधानिया यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले होते. सुरेश बाबू लोकरे यांनी आठ दिवसांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत पोलिसांचे आभार मानले. सिमी कटारिया यांनी पोलीस दलातील कामगिरी ही स्कॉटलंड यार्ड किंवा अमेरिकन पोलीस यांच्यापेक्षाही प्रभावशाली असलयाचे मनोगत व्यक्त केले. पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे, अरुण भोर, प्रविण तेजाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजीपार्क, माहीम, शाहूनगर, धारावी, कुर्ला आणि विनोबा भावे नगर येथील अधिकारी आणि अंमलदारांनी आरोपींकडून हा मुद्देमाल हस्तगत केला होता. हा मुद्देमाल पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त त्यांच्या मूळ मालकांना देण्यात आला.