शाळेतच सोळा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या
शूजच्या लेसच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जानेवारी २०२५
मुंबई, – गोरेगाव परिसरातील एका नामांकित शाळेत गुरुवारी दुपारी एका सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शूजच्या लेसच्या सहाय्याने कडी गळफास घेऊन तिने जीवन संपविले. या मुलीकडे सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आरे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तिच्या पालकांची जबानी नोंदवून घेतली आहे. या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी यांनी सांगितले. दरम्यान दुपारी उघडकीस आलेल्या या आत्महत्येच्या घटनेने शाळेतील शिक्षकासह विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
मृत सोळा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत वांद्रे येथे राहत असून तिचे वडिल प्रसिद्ध वकिल म्हणून परिचित आहेत. ती सध्या गोरेगाव येथील आरे कॉलनीतील नामांकित शाळेत अकरावीत शिकत होती. या शाळेची वार्षिक फि सतरा ते अठरा लाख रुपये असल्याचे बोलले जाते. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. दुपारी ती टॉयलेटला गेली आणि परत आली नाही. काही वेळानंतर तिथे एक विद्यार्थिनी गेली होती. यावेळी तिला या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिने शूजच्या लेसच्या सहाय्याने कडीला गळफास घेऊन जीवन संपविले होते. शाळेच्या शिक्षकांकडून ही माहिती प्राप्त होताच पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. तिला तातडीने जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली होती.
तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणाविरुद्ध संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे आरे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मृत मुलगी ही मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र या तणावाचे काय कारण होते याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तिच्या पालकांसह शाळेतील मित्र-मैत्रिणीसह इतरांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे बोलले जाते.