गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने दोन बंधूंना गंडा

७० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पिता-पूत्रांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जानेवारी २०२५
मुंबई, – भिशी गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून दोन व्यावसायिक बंधूंची सुमारे ७० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह त्याच्या दोन मुलांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उमर बाबू सय्यद, तुफेल उमर सय्यद आणि दानिश उमर सय्यद अशी या तिघांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्याने या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

नरींदरसिंग रजिंदरसिंग कोहली हे ६१ वर्षांचे वयोवृद्ध साकिनाका येथील चांदीवली परिसरात राहतात. त्यांचा फायनाशियल कन्सल्टंसीचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी पवई येथील एक हॉटेल त्यांनी चालविण्यासाठी घेतले होते. या हॉटेलची जागा भाड्याने घेण्यासाठी त्याला प्रॉपटी एजंट उमर सय्यद याने मदत केली होती. तो अनेकदा त्यांच्या हॉटेलमध्ये येत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. कोरोना काळात त्यांनी हॉटेल बंद केले होते. त्यानंतर जानेवारी २०२३ रोजी उमरने त्यांना कॉल केला होता. त्याने त्यांना एक गुंतवणुक योजनेची माहिती देताना त्यात त्यांन हमखास चांगला परतावा मिळेल असे सांगितले होते. त्याने त्याच्या मित्रांसोबत भिसी (चिट फंड) सुरु केली असून त्यात २० सभासद आहे. या भिसीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना नक्कीच फायदा होणार असल्याने त्यांनी त्यांना सभासद होण्याची विनंती केली होती.

२०२५ साली त्यांच्या मुलाचे लग्न होते, त्या वेळेस त्यांना पैशांची गरज लागणार होती. त्यामुळे त्यांनी उमरच्या भिसीमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. इतकेच नव्हे तर त्यांचा भाऊ गुरमीतसिंगला या योजनेची माहिती सांगितली होती. ठरल्याप्रमाणे ते दोघेही उमरकडे गेले होते. यावेळी उमरने भिसीमध्ये दरमाह दिड लाख रुपये जमा केल्यास वीस महिन्यानंतर त्यांना तीस लाख रुपये मिळेल असे सांगितले होते. भविष्यात या पैशांची खूप मदत होईल या आशेने त्यांनी त्याच्या भिसीमध्ये दरमाह दिड लाख रुपये भरण्यास सुरुवात केली होती. दरमाह प्रत्येक सभासदाला भिसीची रक्कम दिली जात होती.

सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना पैसे देण्याची वेळ आली असता इतर सभासदांनी पैसे जमा केले नव्हते. त्यामुळे उमरसह त्याचे दोन मुले तुफेल आणि दानिश यांनी ही भिसी बंद केली होती. त्यापूर्वी नोव्हेंबर २०२३ साली उमरच्या सांगण्यावरुन नरींदरसिंग कोहली यांनी अन्य एका भिसीमध्ये गुंतवणुक केली होती. त्यात सोळा सभासद होते. दोन सभासदाचे प्रत्येकी दोन लाख रुपये ते उमरला दरमाह देत होते. या भिसीच्या वेळेसही त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांनी भिशीचे पैसे दिले नाही. इतर सभासदांनी पैसे जमा केले नसल्याने त्यांना पैसे देता आले नाही असे सांगून त्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. पैशांची मागणी केल्यानंतर उमरने त्यांना त्याच्या मालकीची फॉरच्युनर लेंजेडर कार दिली होती. या कारचा करारनामा आणि नोटरी व्हॉटअपवर पाठविला.

मात्र या कारवर बँकेचे हप्ते होते. ते हप्ते भरण्याचे त्याने आश्‍वासन दिले होते, मात्र त्याने कारचे हप्ते भरले नाही. तसेच त्यांनी भिशीमध्ये गुंतवणुक केलेली रक्कमही परत केली नाही. अशा प्रकारे उमरसह त्याच्या दोन्ही मुलांनी एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत त्यांच्यासह त्यांच्या भावाला भिशीमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून ऑनलाईन २२ लाख ८४ हजार २५० तर रोख स्वरुपात ४७ लाख ५ हजार ७९० रुपये असे ६९ लाख ९० हजार रुपये घेऊन मूळ रक्कमेसह कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच नरींदरसिंग कोहली यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उमरसह त्याचे दोन मुले तुफेल सय्यद आणि दानिश सय्यद या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांनी अशाच प्रकारे इतर काहींना भिशीच्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page