आर्थिक अडचणीत सापडलेल्या ५५ वर्षांच्या कापड व्यापार्याची आत्महत्या
ज्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केला, तिथेच गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – आयुष्याची संपूर्ण जमापूंजी गुंतवणुक केल्यानंतर बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दिलीप जियालाल शेठ या ५५ वर्षांच्या कापड व्यापार्याने आत्महत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ज्या इमारतीमध्ये दिलीपने फ्लॅट बुक केला होता, त्याच इमारतीमध्ये जाऊन त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येनंतर त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या सुसायट नोटनंतर मालाड पोलिसांनी भरत नवीनचंद्र गाला या बिल्डरविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना २६ फेब्रुवारीला मालाड येथील नाडियादवाला कॉलनी क्रमांक दोन, संतोष अपार्टमेंटमध्ये घडली होती. पूजा दिलीप शेठ ही ५४ वर्षांची महिला मालाडच्या आर्लेम, सुंदरलेन ल्यूॅऑन अपार्टमेंटमध्ये तिच्या दोन मुले आणि सासूसोबत राहते. तिचे पती दिलीप शेठ यांचा मालाड येथे सिमरन क्रिएशन नावाचा लेडीज कुर्ता बनविण्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय होता. दिलीप यांचा मामा कृष्णन लक्ष्मणदास वीज यांचा मालाडच्या संतोष अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट आहे. तिथे त्यांचे नेहमीच येणे-जाणे होते. या इमारतीच्या पुर्नविकासाचे काम स्थानिक रहिवाशांनी भरत गाला या बिल्डरला दिले होते. त्यातून दिलीप आणि भरत यांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. भरतची अरिहंत बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स नावाची एक कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे.
२०१८ साली दिलीप शेठ हे मिरारोड येथे राहत होते, त्यामुळे त्यांना त्या फ्लॅटची विक्री करुन मुंबईत एक फ्लॅट घ्यायचा होता. याच दरम्यान भरतने दिलीपला त्याच्या पुर्नविकास इमारतीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर चांगला परतावा किंवा एक फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या व्यवसायात एक कोटीची गुंतवणुक केली होती. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात एक कोटीवर व्याज देण्याचे किंवा पुर्नविकास इमारतीमध्ये एक फ्लॅट देण्याबाबत नमूद करण्यात आले होते. गुंतवणुक रक्कमेवर काही महिने भरतने त्यांना व्याज दिले, मात्र कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. व्याजाची रक्कम देता येत नसल्याने ठरल्याप्रमाणे भरतने दिलीप यांना एक फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्याने दिलीपसह त्यांच्या मुलाच्या नावाने संतोष अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००२ रजिस्टर अग्रीमेंट केला होता. यावेळी त्यांना सहा महिन्यांत फ्लॅटचा ताबा देतो असे सांगितले. मात्र त्याने इमारतीचे काम पूर्ण केले नाही. भरतने स्थानिक रहिवाशांनाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे या रहिवाशांनी त्याच्याविरुद्ध २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावेळी न्यायालयाने भरतला ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत स्थानिक रहिवाशांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश जारी केले होते.
मात्र वारंवार विनंती करुनही तो दिलीप शेठ यांना त्यांचा फ्लॅटचा ताबा देत नव्हता. दिलीप यांनी त्यांची सर्व जमापूंजी भरत शेठच्या व्यवसायात गुंतवणुक केली होती. त्यात ते भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. भाड्याचे ४२ हजार रुपये, दोन्ही मुलांचा शिक्षण आणि घरखर्चासाठी त्यांना अनेक अडचणी येत होत्या. त्यातच त्यांचा कपड्याचा व्यवसाय चालत नसल्याने त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. २६ फेब्रुवारीला दिलीप हे कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेले. मात्र कामावर न जाता ते संतोष अपार्टमेंटमध्ये गेले. तिथेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिलीप यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अलीकडेच त्यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलचे लॉक ओपन केले होते. त्यात त्यांनी एक सुसायट नोट लिहून ठेवल्याचे दिसून आले. आर्थिक चणचणीमुळे मी आत्महत्या करत आहे. त्याला कोणीही जबाबदार नाही. भरत गालाला त्याच्या व्यवसायात मी आर्थिक मदत केली होती. मात्र त्याने मला पैसे किंवा फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्याने शक्य झाल्यास माझ्या कुटुंबियांन फ्लॅटचा ताबा द्यावा असे नमूद केले होते. या सुसायट नोटची माहिती नंतर पूजा शेठने मालाड पोलिसांना दिली होती. याप्रकरणी तिची जबानी नोंदविण्यात आली होती. या जबानीत तिने तिच्या पतीच्या आत्महत्येस बिल्डर भरत गाला हाच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्याच्यविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भरत गालाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.