पोलीस शिपाई चालक परिक्षाप्रकरणी अन्य पाच गुन्ह्यांची नोंद

परिक्षा देण्यापूर्वीच तरुणीसह पाचजणांवर अटकेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – पोलीस शिपाई चालक भरती परिक्षा २०२५ साठी परिक्षा देण्यासाठी फसवणुकीचा मार्गाने अवलंब केल्याप्रकरणी अन्य पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून याच गुन्ह्यांत एका तरुणीसह पाचजणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई कांदिवली, टिळकनगर, कस्तुरबा मार्ग आणि व्ही. पी रोड पोलिसांनी केली आहे. ओशिवरा येथे शनिवारी एका तरुणावर कारवाई सुरु असतानाच इतर पाच ठिकाणी असाच प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपींकडून पोलिसांनी विझिटिंग कार्डसह ब्ल्यू टूथ आणि बोगस हॉल तिकिट जप्त केले असून या डिजीटल साहित्यासह बोगस हॉल तिकिटाचा वापर करुन ते सर्वजण परिक्षा देण्यासाठी आले होते. अटक केलेले सर्व आरोपी बीड आणि संभाजीनगरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलीस दलात सध्या पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती सुरु आहे. त्यासाठी शनिवारी मुंबई शहरात संबंधित उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कॉपीचे प्रकार घडू नये म्हणून सर्वच परिक्षा केंद्रावर स्थानिक पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच दरम्यान शनिवारी जोगेश्‍वरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोड, रायगड मिलिटरी स्कूलमध्ये लेखी परिक्षा देण्यासाठी आलेल्या कृष्णा महादेवराव दळवी या २५ वर्षांच्या तरुणाला डिजीटल कॉपी करताना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चिपसह ब्लूट्यूथ जप्त केले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यता आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सचिन बावस्कर आणि प्रदीप राजपूत या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून ते तिघेही मूळचे जालनाचे रहिवाशी आहे.

ही कारवाई सुरु असतानाच बोरिवलीतील एका परिक्षा केंद्रातून रौफ पठाण या २७ वर्षांच्या तरुणाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. शनिवारी तो परिक्षा देण्यासाठी आला होता. कॉपी करण्याच्या उद्देशाने त्याने स्वतजवळ डिजीटल साहित्य ठेवले होते. तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यत आली. दुसर्‍या घटनेत चेंबूरच्या एका महविद्यालयात आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते दोघेही लेखी परिक्षेसाठी आले होते. त्यांच्याकडे पोलिसाना विझटिंग कार्डसारखे डिवाईस सापडले. त्यात सिमकार्ड, बॅटरी आणि एअरपीस जोडले होते. त्यांनी ते डिवाईस शरीरात लपवून आाणले होते. त्यानंतर या दोघांनाही टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

कांदिवलीतील एका शाळेत परिक्षा देण्यासाठी अन्य एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मैदानी परिक्षेत नापास झाला होता. तरीही त्याने खोटी माहिती देऊन परिक्षा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गिरगाव येथील एका परिक्षा केंद्रावर आलेल्या दिव्या रमेश अंभोरे या १९ वर्षांच्या तरुणीला व्ही. पी रोड पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने तिची मैत्रिण पूजा सदाफळ आणि मित्र पंकज चव्हाण यांच्या मदतीने हॉल तिकिटामध्ये फेरबदल केला होता. बोगस हॉल तिकिट घेऊन ती परिक्षा देण्यासाठ आली होती. त्यामुळे दिव्यासह तिचे मित्र पूजा आणि पंकज यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दिव्याल पोलिसांनी अटक केली तर इतर दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page