मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – पालघरच्या निहालपाड्यातील शेतात पत्र्याचा शेड तयार करुन बोगस नोटांचा सुरु असलेला कारखानाच भायखळा पोलिसांनी उद्धवस्त केला. याप्रकरणी भायखळा आणि पालघर येथून चार आरोपींना पोलिसांनी बोगस नोटांसह त्यासाठी लागणार्या साहित्यासह अटक केली. उमरान ऊर्फ आसिफ उमर बलबले, यासिन युनूस शेख, भीम प्रसादसिंग बडेला आणि निरज वेखंडे अशी चौघांची नावे आहेत. यातील उमरान मुंब्रा, निरज पालघर तर इतर दोन आरोपी भायखळ्यातील रहिवाशी असून अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील मुख्य सूत्रधार खलील अन्सारी हा कारवाईनंतर पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
बोगस नोटाची तस्करी करणारी एक टोळी शहरात कार्यरत असून या टोळीतील काहीजण बोगस नोटा घेऊन भायखळा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी भायखळा पोलिसांच्या एका विशेष पथकाने भायखळा येथील प्रसाद पान बिडी जनरल स्टोरजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. तीन दिवसांपूर्वी तिथे तीन तरुण आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना पाचशे रुपयांचे दोनशे बोगस नोटा सापडल्या. तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बोगस नोटा बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून दुसर्या दिवशी लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.
चौकशीत त्यांना त्या बोगस नोटा खलील अन्सारी आणि निरज वेखंडे यांनी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. ते दोघेही पालघरचे रहिवाशी असून त्यांनी त्यांच्या गावातील शेतात एका पत्र्याचे शेड तयार केले आहे. तिथे ते बोगस नोटांचे छपाई करतात अशी माहिती समजली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे दोन दिवस साध्या वेशात पाळत ठेवून निरजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने खलीलच्या मदतीने त्यांनी बोगस नोटाची छपाई सुरु केल्याची दिली. पालघरच्या निहालपाड्यात त्यांनी बोगस नोटांचा कारखाना सुरु केला होता. शेतात पत्र्याचे शेड टाकून गेल्या सात महिन्यांपासून ते दोघेही बोगस नोटांची छपाई करत होते.
या कटाचा खलील हा मुख्य आरोपी असून कारवाईनंतर तो पळून गेला आहे. त्याला अशाच एका गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बोगस नोटांची छपाई सुरु केली होती. त्यांच्या शेतातील कारखान्यात पोलिसांनी छापा टाकून दोन लॅपटॉप, चार्जर, माऊस, १३६७ नग बटर पेर, नोटांच्या मध्ये इंग्रतजीत लिहिलेली तार, दोन स्क्रिन प्रिटींग डाय, स्क्रिन प्रिटींग रोलर, लॅमिनेशन फिल्मस आदी मुद्देमाल जप्त केला आहे. बागस नोटा तयार झाल्यानंतर इतर आरोपींच्या मदतीने ते दोघेही मुंबईत विक्री करत होते. निवडणुक काळात या बोगस नोटांचा वापर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ३५ ते ४० हजार रुपये दिल्यानंतर ते एक लाखांच्या बोगस नोटा देत होते. कोणालाही संशय येऊन या नोटा ते बाईकच्या डिक्कीतून मुंबईत आणत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी उमरान, यासिन आणि भीम यांना भायखळा येथे बोगस नोटांची डिलीव्हरीसाठी पाठविले होते. मात्र या तिघांना पोलिसांनी अक करुन या बोगस नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश केला.
सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर चिंदरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पोलीस निरीक्षक जितेश शिंगोटे, नवनाथ घुगे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, बालाजी असादे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस हवालदार हर्षल देशमुख, राकेश कदम, रामदास पठारे, पोलीस शिपाई राजेश राठोड, राकेश जाधव, सोमनाथ जगताप, राजेश पाटील, अनिरुद्ध सावंत, प्रणित सोनावणे, जगदीश देसाई, अविनाश चव्हाण यांनी ही कामगारी केली आहे.