भुरळ पाडून सोन्याचे दागिने पळविणार्‍या दुकलीस अटक

काळे-पवार टोळीच्या वयोवृद्ध महिलेसह तरुणाचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन विविध आमिष दाखवून भुरळ पाडून त्यांच्या अंगावरील दागिने चोरी करुन पळून जाणार्‍या एका दुकलीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. त्यात एका वयोवृद्ध महिलेचा समावेश असून ती काळे-पवार टोळीशी संबंधित टोळीचा म्होरक्या शैलेश दशरथ पवार याची आई आहे. समीर नासीर शेख आणि लता दशरथ पवार अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने विविध कारण सांगून अनेकांना विशेषता वयोवृद्धांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या अटकेने अशाच अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

आशादेवी शिवप्रसाद राजभर ही ५८ वर्षांची महिला बोरिवली परिसरात राहते. शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास ती तिची नातू शिवा हिला शाळेत सोडून घरी जात होती. यावेळी सुख जीवन सर्कल, गुरुकृपा इमारतीजवळ तिच्याजवळ एक महिला आली. तिच्यासोबत एक तरुण होता. या दोघांनी तिला पार्ले जी बिस्कीटचे पुडे दिले. तुमच्या मुलांना बिस्कीट घेऊन असे सांगून त्यांनी तिला भुरळ पाडून तिच्या गळ्यासह कानातील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. काही अंतर गेल्यानंतर तिला हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे तिने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, पोलीस निरीक्षक विजय आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस हवालदार अनिल शिंदे, रविंद्र पाटील, महातेश सवळी, योगेश मोरे यांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी बोरिवली परिसरातून समीर शेख आणि लता पवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ते दोघेही काळे-पवार टोळीशी संबंधित असून ही टोळी मूळची परभणी, बीडची आहे. या टोळीचा म्होरक्या शैलेश दशरथ पवार असून सध्या तो कारागृहात आहे. लता ही त्याची आई तर समीर त्याचा सहकारी आहे.

आमच्या शेठला मुलगा आहे, ते मोफत अन्नाचे वाटप करत आहे असे आणि अशाच प्रकारचे विविध कारण सांगून ही टोळी अनेकांना भुरळ पाडून त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन पळून जात होते. या टोळीविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page