मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – मोबाईलसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली म्हणून रागाच्या भरात चारजणांच्या एका टोळीने दोन तरुणांवर दगडासह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. या हल्ल्यात सुरेश रमेश हरिजन आणि त्याचा मामेभाऊ राजेश कन्नन हरिजन असे दोघेही जखमी झाले असून सुरेशवर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चारही हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली. ओम विशाल वाघमारे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत शिवम देवडे, मोसिम आणि कल्लू वाघमारे या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून पळून गेलेल्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
२४ वर्षांचा सुरेश हरिजन हा तरुण बोरिवलीतील टाटा पॉवर, मागाठाणे झोपडपट्टीत राहत असून मजुरीचे काम करतो. चारही आरोपी त्याच्या परिचित असून ते सर्वजण बोरिवली परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी सुरेशने ओमला सेकंड हॅण्ड मोबाईल खरेदीसाठी पैसे दिले होते. मात्र त्याने त्याला मोबाईल दिले नाही. त्यामुळे त्याने त्याच्याकडे मोबाईलसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता मागाठाणे सिग्नलजवळ ओमने त्याच्या इतर तीन सहकार्यांसोबत सुरेशला अडविले. पैशांवरुन त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर आधी दगडाने आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. आज तुझा गेमच वाजवितो असे सांगून त्याला लाथ्याबुक्यांनी बेदममारहाण केली. हा प्रकार सुरेशचा मामेभाऊ राजेशच्या निदर्शनास येताच त्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने त्यांनी राजेशवर वार केले होते.
या हल्ल्यात सुरेशच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाली तर राजेशला कमरेखाली दुखापत झाली होती. जखमी दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सुरेशची दुखापत असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले तर राजेशला प्राथमिक उपचारानंतर सोडून दिले. ही माहिती मिळतच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुरेश हरिजनची जबानी नोंदवून पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या ओमला पोलिसांनी काही तासात अटक केली तर इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.