टोरेस कंपनीचा घोटाळा ५७ कोटीवर पोहचला

३ हजार ७०० गुंतवणुकदारांची तक्रार नोंदविली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – दादरच्या टोरेस कंपनीतील घोटाळ्याचा व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून मंगळवारी या कंपनीचा घोटाळा ५७ कोटीवर पोहचला आहे. आतापर्यंत ३ हजार ७०० गुंतवणुकदांनी तक्रार नोंदविली असून या तक्रारीवरुन हा आकडा बाहेर आला आहे. दुसरीकडे टोरेस कंपनीच्या कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आता ईडीची चौकशी सुरु केल्याने कंपनीतील संचालकासह पदाधिकार्‍यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेसह आता ईडीने स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केल्याचे बोलले जाते.

चांगला परताव्याच्या आमिषाने टोरेस कंपनीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्‍याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे या कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असून पोलीस कोठडीत असलेल्या तिन्ही आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी सुरु आहे. मंगळवारपर्यंत ३ हजार ७०० गुंतवणुकदारांनी त्यांची सुमारे ५७ कोटीची फसवणुक झाल्याचे सांगितले आहे. काही गुंतवणुकदार अद्याप तक्रार करण्यासाठी येत असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यंत १७ कोटी ४० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.

कांदिवलीतील पोईसर येथील कार्यालयातून या अधिकार्‍यांनी काही कॅश, दागिने, महत्त्वाचे कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक दस्तावेज आदी मुद्देमाल जप्त केला आहे. याच शाखेत पोलिसांना तीन तिजोरी सापडल्या आहेत. त्या उघडण्यासाठी टेक्निकल टिमची मदत घेतली जाणार आहे. त्यात महत्त्वाचे कागदपत्रे, पैसे किंवा मौल्यवान वस्तू असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील तानिया उझबेकिस्तान तर वेलेटिंना ही रशियन नागरिक आहे. इतर संचालकामध्ये काही संचालक विदेशी नागरिक असल्याने या गुन्ह्यांची व्याप्ती मुंबईसह विदेशात पसरली आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत आता ईडीची इंट्री झाली आहे. मनी लॉड्रिंगप्रकरणी सोमवारी ईडीकडून कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्‍यांकडून गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांचा ईडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी काही अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. या अधिकार्‍यांकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित कागदपत्रे ईडी अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आले आहे. ईडीकडून तपास सुरु असल्याने या कथित पोंझी घोटाळ्याचा आणखीन खोलात जाण्यास तसेच पुरावे गोळा होण्यास मदत होणार आहे. या गुन्ह्यांशी संबंधित काही लोकांची लवकरच चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या गुन्ह्यांत अकराजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात कंपनीचा सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, संचालक व्हिक्टोरिया कोलालेन्को, माजी संचालक ओलेना स्टोअन, प्रमोटर इम्रान जावेद, मुस्तफा काराकोक, ऑलेक्झांडर झोपिचेन्को, ओलेक्ट्राझांड्रा बुनकिव्हरस्का, ओलेक्झांड्रा ट्रेडखिब आर्टेम ऑलीफरचुक आणि इउरचेन्को झगोर यांचा समावेश आहे. यातील काही आरोपी विदेशी नागरिक असल्याने त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे.

या कटाचा मुख्य सूत्रधार कोण, टोरेस कंपनी नक्की कोणाच्या मालकी आहे. त्यात सुरुवातीला कोणी आर्थिक गुंतवणुक केली याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेसह ईडीचे अधिकारी करत आहे. यातील विदेशी नागरिकांनी युक्रेनसह रशियामध्ये अशाच प्रकारे गुंतवणुक योजना केली होती. कंपनीकडून श्रीलंका येथे अशाच प्रकारे गुतवणुक योजना सुरु करण्याचा कट होता. त्याची जबाबदारी तौफिक रियाझवर सोपविण्यात आल्याचे बोलले जाते. मनी लॉड्रिंगप्रकणी ईडीने स्वतंत्र तपास सुरु केल्याने या गुन्ह्यांतील आरोपींच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page