बी केअरफुल बॉम्ब व रिवेन्ज असा मजकूर देऊन धमकी
गोवा-मुंबई इंडिगो एअरलाईन्समध्ये मिळालेल्या पत्राने तणाव
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – बी केअरफुल बॉम्ब आणि रिवेन्ज असा मजकूर लिहिलेला पत्र विमानाच्या वॉशरुममध्ये ठेवल्याने सोमवारी रात्री गोव्याहून मुंबईकडे येणार्या इंडिगो एअरलाईन्समधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही. केवळ भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने सदरचे कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या व्यक्तीविरुद्ध एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
३३ वर्षांचे अभिजीत प्रकाश सावंत हे दहिसरच्या चुन्नाभट्टी, एमएचबी कॉलनीतील रहिवाशी आहे. सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्समध्ये सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. त्यांच्यावर शिफ्ट हॅण्डल करणे, सर्विलन्स, अलोकेटिंग स्टाफ, सिक्युरिटी कंप्लाईन्स आणि फ्लाईट मॉनिटरींग आदी कामाची जबाबदारी आहे. सोमवारी इंडिओ एअरलाईन्सचे एक विमान गोवा येथून मुंबईच्या दिशेने निघाले होते. विमान लॅण्ड होण्यापूर्वीच वीस मिनिटांपूर्वी कॅबीन क्रु सपना कार्की हिला फ्लाईमधील मागच्या लॅवेटरी वॉशरुममध्ये एक चिठ्ठी सापडली होती. त्यात एका बाजूला बी केअरफुल बॉम्ब तर दुसर्या बाजूला रिवेन्ज असे लिहिले होते.
निळ्या शाईच्या पेनाने हा मजकूर लिहण्यात आला होात. ते पत्र तिने पायलट पुष्कराज वाघ यांच्याकडे दिली. त्यानंतर त्यांनी एटीसी टॉवर आणि संबंधित अधिकार्यांना ही माहिती दिली होती. रात्री पावणेअकरा वाजता ते विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्ड झाले होते. बॉम्बसंदर्भात धमकी असलेले पत्र सापडल्याने ते विमान आयसोलेट बे या ठिकाणी लावण्यात आले होते. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवून सुरक्षारक्षकांनी विमानाचा ताबा घेऊन बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने तपासणी सुरु केली होती. संपूर्ण विामनाची तसेच प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडले नाही.
इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने वॉशरुममध्ये मिळालेले पत्र आणि लेखी तक्रार घेऊन अभिजीत सावंत यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या पत्रामुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानात अशांतता निर्माण होईल, प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.