डॉक्टरच्या फ्लॅटसह कापड व्यापार्‍याच्या दुकानात घरफोडी

साडेसतरा लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – डॉक्टरच्या फ्लॅटसह कापड व्यापार्‍याच्या दुकानात घरफोडीची दोन घटना परळ आणि काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. या दोन्ही गुन्ह्यांत अज्ञात चोरट्याने सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. याप्रकरणी भोईवाडा आणि एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

राहुलकुमार रामचंद्र गुप्ता हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांच्या कुटुंबियांसोबत परळ येथील केईएम हॉस्पिटल कॅम्पस, सीओ वसाहतीत राहतात. ते केईएम हॉस्पिटलमध्ये २००८ पासून कामाला असून सध्या तिथे प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांच्यासह त्यांची पत्नी पारुल सुगंधी यादेखील स्त्रीरोगतंज्ञ असून त्या घाटकोपरच्या पारेख हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. सोमवारी ते त्यांच्या मुलाला शाळेत सोडून कामावर गेले होते. दुपारी तीन वाजता त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला, तिने त्यांचा मुलगा घरी आला असून घरात काहीतरी झाले आहे. त्यामुळे ते तातडीने घरी गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले. सकाळी पती-पत्नी कामावर तर मुलगा शाळेत गेल्यानंतर फ्लॅटमध्ये कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यात विविध सोन्याचे दागिने, ५ लाख ६० हजाराची कॅश, ३५ हजाराचे डॉलर, पॅनकार्ड, आधारकार्ड, कारचे कागदपत्रे बँकेचे डेबीट-क्रेडिट कार्ड आदीचा समावेश आहे. या घटनेंतर राहुलकुमार गुप्ता यांनी भोईवाडा पोलिसांना ही माहिती दिली होती.

दुसरी घटना दादीशेठ अग्यारी लेन, पद्मावती इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घडली. ६२ वर्षांचे हसमुख खिमराज जैन हे कापड व्यापारी असून ते लालबाग परिसरात राहतात. त्यांचा पद्मावती इमारतीमध्ये वडिलोपार्जित कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी लग्नासाठी ५ लाख ४२ हजाराची कॅश दुकानात आणून ठेवली होती. रविवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेशकरुन ड्राव्हरमधील ही कॅश चोरी करुन पलायन केले होते. रात्री सव्वादहा वाजता हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना हीम सांगितली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या दोन्ही घरफोडीच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताबयात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page