मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – अश्लील संभाषण करुन एका २४ वर्षीय सुरक्षारक्षक तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीच्या तक्रारीवरुन आरोपी टॅक्सीचालक रामनवल राजबीर यादव याच्याविरुद्ध एअरपोर्ट पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
२४ वर्षांची तक्रारदार तरुणी ही विलेपार्ले परिसरात राहते. ती सध्या सेक्युर वन या सिक्युरिटी गार्ड पुरविणार्या कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी १० जानेवारीला ती सकाळी आठ वाजता कामावर हजर झाली होती. यावेळी तिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी एक्झिट पॉईट येथे कर्तव्य देण्यात आले होते. यावेळी तिथे एक टॅक्सी उभी होती. काही वेळानंतर टॅक्सीचालकाने तिला खाना हुआ क्या अशी विचारणा केली. तिने त्याला होकार उत्तर दिले. त्यानंतर त्याने तिला काल कुठे होतीस, दिसलीस नाहीस असे विचारले. त्यावर तिने काल सुट्टी होती, तुला काय करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता.
घडलेला प्रकार तिने कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर हा प्रकार तिचे सुपरवायझर यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी संबंधित टॅक्सीचालकाची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. चौकशीदरम्यान रामनवल राजबीर यादव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या आझमगढ, लालगंजचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. सध्या तो विलेपार्ले येथील संजयनगर परिसरात राहत असून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमित येत होता. ही माहिती प्राप्त होताच त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी टॅक्सीचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रामनवल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.