ड्रग्ज तस्करीप्रकरणी विदेशी नागरिकासह तिघांना अटक
६७ लाखांचे एमडी ड्रग्जसहीत कफ सिरपच्या बॉटल्स जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
ठाणे, – ड्रग्ज तस्करीप्रकरणी एका विदेशी नागरिकासह तिघांना ठाणे ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. जॉन जेम्स फ्रॉन्सिस ऊर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट ऊर्फ जॉन इझुग्वा फ्रॉन्सिस, नौशाद अन्सार अहमद शेख आणि मोहम्मद तौकीर फारुख अन्सारी अशी या तिघांची नावे आहेत. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी सुमारे ६७ लाखांचे एमडी ड्रग्जसहीत ४६७ कोडीनयुक्त कफ सिरपच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाण्यातील शिळडायघर, खिडकाळी रोड परिसरात काही विदेशी नागरिक एमडी ड्रग्ज डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, नितीन भोसले राजेंद्र निकम, मोहन परब, पोलीस हवालीदार विक्रांत पांलाडे, प्रशांत राणे, शिवाजी वासरवाड, अभिजीत मोरे, हरिश तावडे, हेमंत महाले, महेश साबळे, अमोल देसाई, हुसैन तडवी, संदीप भांगरे, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, कोमल लादे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमरणे रिवरवुड पार्कसमोरील देसाई नाका परिसरात जॉन फ्रॉन्सिस आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ६६१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा सापडला. त्याची किंमत ६६ लाख १८ हजार रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध शिळडायघर पोलीस ठाण्यात एनडपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. जॉन हा मूळचा नायजेरीयन नागरिक असून सध्या तो मशिदबंदर परिसरात राहतो. २०१९ साली तला मुंबई पोलिसांच्या वांद्रे ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला विशेष एनडीपीएस कोर्आने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठवली होती. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तो शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला होता. पैशांची गरज असल्याने तो पुन्हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी झाला होता. त्यामुळे तो एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी शिळडायर परिसरात आला होता. मात्र एमडी ड्रग्जच्या डिलीव्हरीपूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.
अशाच अन्य एका गुन्ह्यांत या पथकाने नौशाद शेख आणि मोहम्मद तौकिर या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी कोडीनयुक्त कफ सरपच्य ४६७ बॉटल्स जप्त केल्या. त्याची कंमत ८७ हजार ७७७ इतकी आहे. दोन्ही आरोपी मूळचे भिवंडीचे रहिवाशी आहे. ते दोघेही कोनगाव, गोवेनाका परिसरात या बॉटल्सची विक्रीसाठी आले होते. यावेळी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत दोन्ही आरोपींना अटक केली. नौशादविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएसच्या एका गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.