मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – फ्लॅटमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न करुन चोरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच सिनेअभिनेता सैफअली खान याच्या याच्यावर चाकूने हल्ला करुन पळून गेलेला हल्लेखोर अद्याप मोकाळ असून वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पंधरा ते वीस पथक शोध घेऊन हा हल्लेखोर पोलिसांना सापडत नसल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. हल्लेखोर सापडत नसल्याने कोणीही अधिकारी याबाबतची अधिकृत माहिती देण्यास पुढे येत नसल्याचे दिसून आले. या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. शुक्रवारी दिवसभरात तीन ते चार संशयितासह सैफअलीच्या काही नोकरांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली तर रात्री उशिरा सैफअलीची अभिनेत्री करीना कपूर खान हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या गुन्ह्यांत करीना ही मुख्य साक्षीदार असून हल्ल्याच्या वेळेस ती तिथे उपस्थित होती.
गुरुवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्या वांद्रे येथील सदगुरु शरण या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला, मात्र चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने सैफअलीसह त्याच्या दोन स्टाफ महिलांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. हा प्रकार समजताच वांद्रे पोलिसांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पंधरा ते वीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाला मुंबईसह मुंबईबाहेर पाठविण्यात आले आहे. मात्र हल्ल्याच्या घटनेला ४० तास उलटूनही अद्याप पळून गेलेल्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. हा हल्लेखोर वांद्रे आणि माहीम परिसरातील असल्याने त्याच्या अटकेसाठी काही पथकाने संपूर्ण वांद्रे आणि माहीम परिसर पिंजून काढला आहे.
मात्र अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती सापडला नाही. गेल्या काही तासांत पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात हल्लेखोराशी मिळताजुळता एक संशयित आरोपीचा समावेश होता. मात्र या तिघांच्या चौकशीतून त्यांचा या गुन्ह्यांशी काहीही संबंध उघडकीस आला नाही. त्यामुळे या तिघांनाही चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे. रात्री उशिरा अन्य एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. सैफअलीच्या सदगुरु शरण अपार्टमेंटसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील काही फुटेज स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे हल्लेखोर नक्की कुठल्या दिशेने पळून गेला याचा शोध लागला नाही. काही दिवसांपूर्वी सैफअलीच्या घरात सुतारकाम झाले होते. या सुतार कामासाठी काही कामगारांना तिथे प्रवेश देण्यात आला होता. या कामगारापैकी कोणीही हल्लेखोरांच्या संपर्कात होता का याचाही पोलिसाकडून तपास सुरु आहे.
याच संदर्भात काही सुतार कामगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात वारीस सलमानी या सुताराचा समावेश आहे. मात्र त्याच्या चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले. इतकेच नव्हे तर सैफअलीच्या सर्व नोकरांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनाही सोडून देण्यताआले. याच दरम्यान आरोपी हल्लेखोर बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्यात घुसल्याची दिवसभर अफवा होती. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. हल्लेखोराने पळून जाताना स्वतचे कपडे बदलले होते. मात्र त्याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान शुक्रवारी वांद्रे पोलिसांनी सैफअलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिची जबानी नोंदवून घेतली आहे. वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये गेले होते. त्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याचा समावेश होता. या अधिकार्याने करिना कपूर खानची जबानी नोंदवून घेतली.
घटनेच्या वेळेस करिना ही सैफअलीसोबत होती. तिच्या समोरच हल्लेखोराने सैफअलीवर चाकूने हल्ला केला होता. त्यामुळे या गुन्ह्यांत करिना ही मुख्य साक्षीदार असल्याने तिची जबानी नोंदविण्यात आल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. सैफअलीवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्याचीही पोलिसाकडून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. रुग्णालयात जबानी नोंदविण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. त्यामुळे सैफअली हा आता घरी आल्यानंतर त्याची जबानी नोंदविण्यात येणार आहे.