मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – नैरोबी येथून आणलेल्या कोकेनसह एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनायाच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी २६६२ ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २६ कोटी ६२ लाख रुपये इतकी आहे. आरोपी प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या ड्रग्ज तस्कराविरोधात डीआरआयसह अन्य सुरक्षा यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना विदेशातून मोठ्या प्रमाणात कोकेन या ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना नैरोबी येथून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना २६६२ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचा कोकेनचा साठा सापडा. हा कोकेन त्याने हॅडबॅगेच्या बाहेरील आणि आतील बाजूस लपवून आणला होता. जप्त केलेल्या कोकेनची किंमत २६ कोटी ६२ लाख रुपये इतकी आहे. त्याला ते कोणी दिले आणि तो कोकेन कोणाला देणार होता याचा संबंधित अधिकारी तपास करत आहेत.