मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – मनीएज ग्रुप ऑफ कंपनीने सुरु केलेल्या पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून कंपनीशी संबंधित आठ फ्लॅट, ठाण्यासह रायगडमधील चार मोकळे भूखंड आणि सतरा बँक खाती जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यांशी संबंधित मुख्य आरोपी प्रिया प्रभू हिला अंतरिम अटकपूर्व जामिन देताना विशेष सेशन कोर्टाने तिला २२ जानेवारीपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत अनेक गुंतवणुकदारांनी तक्रार केली असून या तक्रारीनंतर फसवणुकीचा आकडा २८ कोटीवर पोहचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
टोरेस घोटाळ्यानंतर मनीएज ग्रुप ऑफ कंपनीचा संचालकांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांद्वारे अनेक गुंतवणुकदारांना आकर्षक व्याजदाराचे आमिष दाखवून फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर अनेक गुंतवणुकदारांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कंपनीचे राजीव जाधव, हरिप्रसाद वेणूगोपाळ, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू आणि अन्य आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२०, ३४ भारतीय न्याय सहिता सहकलम महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यातर्ंगत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत कंपनीचे संचालक असलेले हरिप्रसाद वेणुगोपाळ आणि प्रणव रावराणे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कंपनीशी संबंधित ठाण्यासह रायगड, श्रीवर्धन येथील आठ फ्लॅट, चार भूखंड ताब्यात घेतले आहेत. कंपनीचे सतरा बँकेत खाती असून त्या सर्व खाती फ्रिज करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत अनेक गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविली असून या तक्रारीवरुन हा घोटाळ्यातील फसवणुकीचा आकडा २८ कोटीवर पोहचला आहे.
याच गुन्ह्यांशी संबंधित एक मुख्य आरोपी प्रिया प्रभू हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तिला विशेष न्यायालयाने अटकपूर्व मंजूर करताना दररोज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्यास सांगितले आहे. तिने तिच्या प्रकृतीचे कारण पुढे करुन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे येत्या २२ जानेवारीपर्यंत तिला दोन ते तीन तास चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावे लागणार आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी मुंबईबाहेर गेल्याचे सांगण्यात आले.