मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जानेवारी २०२५
मुंबई, – बोरिवलीतील व्यावसायिकाच्या घरात झालेल्या सुमारे २३ लाखांच्या घरफोडीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या दोघांनीच ही घरफोडीची कबुली दिली आहे. प्रकाश राधेश्याम चिंडारिया आणि दिपक ऊर्फ लाला विद्याचल प्रजापती अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना ४ जानेवारी सायंकाळी सात ते रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बोरिवलीतील विजय सेल्समागील हरि ओम अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या रुम क्रमांक ६०३ मध्ये हेमल योगेश भट हे व्यावसायिक त्यांच्या आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असून त्यांची स्वतची प्रिटींग प्रेस आहे. घरात लग्नकार्य असल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेच्या लॉकरमधून काही सोन्याचे दागिने आणले होते. ते दागिने त्यांनी बेडरुमच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. शनिवारी ४ जानेवारीला त्यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता. त्यामुळे भट कुटुंबिय अंधेरी येथे जेवणासह पार्टीसाठी गेले होते.
सायंकाळी सात वाजता घरातून गेल्यानंतर ते रात्री उशिरा एक वाजता घरी आले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून त्यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. या चोरट्याने कपाटातील विविध सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉईन, दिड किलो चांदीचे भांडी असा सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. रात्री उशिरा एक वाजता ते घरी आले असता त्यांना त्यांच्या फ्लॅट दरवाजा आणि आतील सर्व लाईट चालू असल्याचे दिसून आले. त्यांनी बेडरुमची पाहणी केल्यानंतर कपाटातील सर्व दागिने आणि चांदीचे भांडी चोरट्याने पळवून नेल्याचे दिसले. या घटनेनंतर त्यांनी बोरिवली पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हेमल भट यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे पोलिसांना आदेश दिले होते. या आदेशानंतर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रकाश चिंडारिया आणि दिपक प्रजापती या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.