वेगवेगळ्या अपघातात महिलेसह तीन वयोवृद्धांचा मृत्यू

अंधेरी-घाटकोपर येथील घटना; तीन स्वतंत्र एडीआरची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मार्च २०२४
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका महिलेसह तीन वयोवृद्धांचा मृत्यू झाला. तिन्ही अपघात अंधेरी आणि घाटकोपर परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये हेमा रविंद्र बंगेरा (७१), चॉंद खान (६५) आणि रमेश भिखूभाई राठोड (७६) यांचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी, सहार आणि घाटकोपर पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

पहिला अपघात शुक्रवारी ८ मार्चला सायंकाळी साडेसात वाजता घाटकोपर येथील एलबीएस रोड, स्वस्तिक प्लायवुडसमोरील झायनोव्हा रुग्णालयाजवळ झाला. घाटकोपरच्या शांतीबेन चाळीत रमेश भिखूभाई राठोड हे ७६ वर्षांचे वयोवृद्ध राहत होते. ते नियमित सायंकाळी साडेचार वाजता वॉकसाठी जात होते आणि आणि रात्री साडेआठपर्यंत घरी येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे वॉकसाठी घरातून बाहेर पडले. वॉकदरम्यान सायंकाळी साडेसात वाजता झायनोव्हा रुग्णालयाजवळ एका ऍक्टिव्हा बाईकने त्यांना धडक दिली होती. अपघातात जखमी झालेल्या रमेश राठोड यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी ९ मार्चला सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. अपघातानंतर ऍक्टिव्हा चालक जखमी वयोवृद्धाला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटिव्ही फुटेजवरुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

दुसरा अपघात गुरुवारी ७ मार्चला रात्री साडेआठ वाजता अंधेरीतील महाकाली रोड, जिंजर हॉटेल इमारतीसमोरील झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याच परिसरात मृत हेमा रविंद्र बंगेरा ही ७१ वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. गुरुवारी रात्री आठ वाजता ती भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. भाजी घेऊन घरी येत असताना रात्री साडेआठ वाजता जिंजर हॉटेल इमारतीजवळ एका बाईकस्वाराने तिला जोरात धडक दिली होती. त्यात हेमा या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना होली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. रात्री सव्वानऊ वाजता उपचारादरम्यान हेमा हिचे निधन झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहित बंगेरा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हर्ष खोपकर या २९ वर्षांच्या आरोपी बाईकस्वाराला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

तिसर्‍या अपघातात चॉंद खान या ६५ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. चॉंद हे अंधेरी येथे राहत असून २ मार्चला दुपारी अडीच वाजता ते कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अंधेरीतील चिमटपाडा, मरोळ नाक्याजवळील गणेश मैदानासमोर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्यांचे गुरुवारी ७ मार्चला सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. याप्रकरणी त्यांचा नातू आफ्ताब जलालउद्दीन शेख याच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलजर्गीपणाने वाहन चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page