मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मार्च २०२४
मुंबई, – बिहारहून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेला दोन कोटीचा चरसचा साठा गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या अधिकार्यांनी जप्त केला. याच गुन्ह्यांत अजीज अहमद सिद्धीकी या बिहारी तरुणाला बोरिवली येथून पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी सात किलो चाळीस ग्रॅम वजनाचा चरसचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने सोमवार १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत इतर राज्यातून ड्रग्ज आणून त्याची मुंबई शहरात विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बोरिवली येथे काहीजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिटच्या चारच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे चारचे प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार, मुजावर, सहाय्यक फौजदार विशिष्ठ कोंकणे, संजय परब, उत्तम बोटे, लखन चव्हाण, पोलीस शिपाई प्रसाद गरवड यांनी बोरिवलीतील कार्टर रोड क्रमांक सहा, राजाराम जाधव कंपाऊंडजवळील सेकंड वाईफ फुड कॉर्नरजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी पहाटे तिथे अजीज आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सात किलो चाळीस ग्रॅम वजनाचा चरसचा साठा सापडला. त्याची किंमत दोन कोटी अकरा लाख रुपये आहे.
तपासात अजीज हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून त्याला ते चरस बिहारमधील एका व्यक्तीने दिले होते. या चरसची त्याला मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणार्या एका व्यक्तीला विक्री करायची होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळणार होते. बोरिवली येथून गोरेगावच्या दिशेने जात असताना त्याला या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यानंतर त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अजीजने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे. या ड्रग्जची तो कोणाला विक्री करणार होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास सुरु असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांनी सांगितले.