मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान हल्ल्यात मारेकर्यांनी वापरलेल्या चाकूचा तुकडा वांद्रे तलावात सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या गुन्ह्यांत चाकूचा हा तुकडा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. यापूर्वी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्याकडील बॅग, कपडे आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. ते सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत गुरुवारी अन्य दोन लोकांचे पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे.
गेल्या आठवड्यात शरीफुल हा सैफअलीच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. मात्र त्याचा चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने सैफअलीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्या अटकेनंतर त्याने चाकूचा तुकडा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वांद्रे तलावात फेकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच्यासोबत बुधवारी वांद्रे पोलिसांनी तलावात चाकूचा तुकडा शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना तो तुकडा सापडला नव्हता. अखेर गुरुवारी वांद्रे तलावात चाकूचा तुकडा सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जप्त केलेला चाकूचा तुकडा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.
याच गुन्ह्यांत गुरुवारी पोलिसांनी रिक्षाचालक भजन सिंह याची जबानी नोंदवून घेतली. हल्ल्यात जखमी झालेल्या सैफअलीला त्यानेच लिलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्या रिक्षातून नेले होते. त्यानंतर एका केस कर्तन करणार्या तरुणाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. हल्ल्यानंतर शरीफुल हा वरळी येथे गेला होात. त्याच्याच सलूनमध्ये त्याने त्याचे केस कापडले होते. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी साडेसहाशे ते सातशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे. या फुटेजवरुन त्याला ठाण्यातून अटक करण्यात आले होते. शरीफुलविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर वांद्रे पोलिसांनी भर दिला आहे.