दोन अल्पवयीन मुलींचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

जोगेश्‍वरी-विक्रोळीतील घटना; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – दोन अल्पवयीन मुलींचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना जोगेश्‍वरी-विक्रोळी परिसरात घडली. याप्रकरणी पार्कसाईट आणि ओशिवरा पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत एका रिक्षाचालकास ओशिवरा पोलिसांनी अटक तर दुसर्‍याला पार्कसाईट पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

३४ वर्षांची तक्रारदार महिला ही विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहते. तिला नऊ वर्षांची एक मुलगी आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता परिसरातील एका जवळच्या हॉस्पिटलजवळ जाताना तिला तिच्याच परिचित रिक्षाचालकाने बोलाविले. त्याने तिचा हा पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोक्यावरुन हात फिरवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या घटनेनंतर तिच्या आईने पार्कसाईट पोलिसांत आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच फरमान नावाच्या ३२ वर्षांच्या रिक्षाचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दुसरी घटना जोगेश्‍वरी परिसरात घडली. १४ वर्षांची बळीत मुलगी जोगेश्‍वरी येथे राहत असून सध्या शिक्षण घेते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ती खाजगी क्लाससाठी गोरेगाव येथे रिक्षातून जात होती. यावेळी रिक्षाचालकाने प्रवासादरम्यान तिच्याशी जवळीक निर्माण करुन मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे तिच्या मोबाईलची मागणी केली. तिने त्याला मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला. सतत आरशामध्ये पाहून तिच्याशी अश्‍लील इशारे करुन फ्लाईंग किस केले. रिक्षातून उतरल्यानंतर त्याने तिच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर तिने तिच्या आईला हा प्रकार सांगून ओशिवरा पोलिसांत आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती.

तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तिच्याकडून रिक्षाचा क्रमांक प्राप्त होताच मंगळवारी पळून गेलेल्या हरेंद्र चंद्रसेन गुप्ता या आरोपी रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली. हरेंद्र हा गोरेगाव येथील मुलुंड लिंक रोड, राजीवनगरच्या राजसेवा सोसायटीचा रहिवाशी असून त्यानेच बळीत मुलीचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page