चुकीच्या ऑर्डरवरुन ग्राहकावर हॉटेल कर्मचार्याकडून हल्ला
मॅनेजरसह दोन्ही वेटरला हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – चुकीच्या ऑर्डरबाबत विचारणा केली म्हणून रागाच्या भरात अमीत मुक्ताजी ससाणे या ३६ वर्षांच्या ग्राहकाला हॉटेलच्या कर्मचार्यांकडून लोखंडी रॉडसह काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला टाकले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच हॉटेलच्या मॅनेजरसह दोन्ही वेटर अशा तिघांना पवई पोलिसांनी अटक केली. किरण कुमार कोरगप्पा, प्रकाश उहल यादव आणि कृष्णा बच्चन्ना पुजारी अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास पवईतील मरोळ-मिलिटरी रोडवरील हॉटेल हरिप्रसादमध्ये घडली. अमीत ससाणे हे अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, विजयनगर चाळ कमिटी परिसरात राहतात. मंगळवारी रात्री त्यांच्यासह त्यांच्या मित्रांनी हरिप्रसाद हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर चुकीची असल्याने त्यांनी हॉटेलच्या वेटरला विचारणा केलीद होती. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि हॉटेलचा मॅनेजर किरण कुमार याने वेटरला प्रोत्साहित करुन त्याला मारहाण करण्यास सांगितले. त्यानंतर या वेटरने त्याला तुला आज सोडणार नाही, स्वतला मोठा वकिल समजतो काय असे सांगून त्याच्या सहकार्यासोबत त्यांच्यावर लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात अमीत ससाणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मॅनेजरसह दोन्ही वेटर प्रचंड आक्रमक झाल्याने ते दोघेही तेथून पळून गेले होते.
जखमी झालेल्या अमीतवर नंतर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरसह इतर दोन वेटरविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हॉटेलमधून तिन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.